

लंडन : रिनेसाँ (प्रबोधन काळ) काळातील महान चित्रकार, ‘मोनालिसा’ या जगप्रसिध्द चित्राचा निर्माता आणि शास्त्रज्ञ लिओनार्दो दा विंची यांचा डीएनए एका चित्रातून प्रथमच मिळवण्यात यश आल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. या शोधामुळे दा विंचींच्या वैयक्तिक गुणधर्मांपासून ते त्यांच्या कलाकृतींच्या सत्यतेपर्यंत अनेक रहस्ये उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘होली चाइल्ड’ नावाच्या लाल खडूने काढलेल्या एका रेखाटनात डीएनएचे सूक्ष्म अंश सापडले आहेत. हे चित्र खुद्द लिओनार्दो दा विंची यांनीच काढले असल्याचा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. या रेखाटनातून मिळालेले अनुवंशिक साहित्य, दा विंचींचे आजोबा अँटोनियो यांचे चुलत भाऊ ‘फ्रोसिनो दी सेर जिओव्हानी दा विंची’ यांनी 1400 च्या दशकात लिहिलेल्या एका पत्रातील डीएनएशी मिळतेजुळते आहे.
संशोधनानुसार, हे चित्र आणि त्या ऐतिहासिक पत्रात ‘वाय’ गुणसूत्रांचे असे क्रम आढळले आहेत, जे टस्कनीमधील एका विशिष्ट अनुवंशिक वंशाशी संबंधित आहेत. टस्कनी हे लिओनार्दो दा विंची यांचे जन्मस्थान आहे. हे संशोधन मंगळवारी (6 जानेवारी) ‘bioRxiv’ या डेटाबेसवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ‘वडिलांकडून मुलाकडे ‘वाय’ गुणसूत्रे जवळजवळ न बदलता हस्तांतरित होतात. त्यामुळे दा विंचींचा डीएनए जुळवण्यासाठी ही एक उत्कृष्ट सुरुवात आहे, असे कनेक्टिकटमधील जॅक्सन लॅबोरेटरीचे जनुकशास्त्रज्ञ चार्ली ली यांनी सांगितले.
या शोधाबद्दल शास्त्रज्ञांमध्ये काही शंकाही आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, ‘होली चाइल्ड’ हे चित्र खुद्द दा विंचींनी न काढता त्यांच्या एखाद्या शिष्याने काढले असावे. तसे असल्यास, हा डीएनए दा विंचींचा नसून त्यांच्या शिष्याचा किंवा टस्कनीशी संबंध असलेल्या एखाद्या क्युरेटरचा असू शकतो, ज्यांनी वर्षानुवर्षे हे चित्र हाताळले आहे. फ्रान्समधील लिओनार्दोंची कबर फ—ें च राज्यक्रांतीदरम्यान अंशतः नष्ट झाली होती, त्यामुळे त्यांचे अवशेष इतर अस्थींमध्ये मिसळले गेले असण्याची शक्यता आहे.
जोपर्यंत ठोस तुलनात्मक पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत फ्रान्समधील त्यांच्या कबरीतून डीएनए नमुने घेण्यास परवानगी मिळालेली नाही. शास्त्रज्ञांना दा विंचींचा डीएनए पुनर्निर्मित करायचा आहे जेणेकरून त्यांच्या वादग्रस्त चित्रांची सत्यता पडताळता येईल. काही तज्ज्ञांचे असेही मत आहे की, दा विंचींच्या असामान्य कलागुणांमागे आणि त्यांच्या तीक्ष्ण द़ृष्टीमागे काही जैविक किंवा जनुकीय कारणे होती का, हे देखील या डीएनए संशोधनातून स्पष्ट होऊ शकते.