

कोटा : वयाची २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या देशातील सर्वात वयोवृद्ध वाघीण ‘महक’ने वन्यजीव वैज्ञानिकांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. सामान्यतः प्राणिसंग्रहालय किंवा पिंजऱ्यात राहणाऱ्या वाघांचे आयुष्य १६ ते १८ वर्षांपर्यंतच असते. मात्र, राजस्थानच्या कोटा येथील अभेडा बायोलॉजिकल पार्कमध्ये राहणारी महक आजही पूर्णपणे तंदुरुस्त आहे. तिचे दात आणि पंजे आजही तितकेच मजबूत आहेत. आता या ‘सुपर टायगर’च्या दीर्घ आयुष्याचे आणि निरोगी आरोग्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी वन्यजीव वैज्ञानिकांची टीम तिच्या ‘डीएनए’ची तपासणी करणार आहे.
देहरादून येथील ‘भारतीय वन्यजीव संस्थान’चे वैज्ञानिक महकवर सखोल संशोधन करण्याची शक्यता आहे. या संशोधनात तिच्या आनुवंशिक रचनेसोबतच (डीएनए) तिची शारीरिक जैविक प्रक्रिया, आहार, लसीकरण आणि उपचारांशी संबंधित माहितीचा अभ्यास केला जाईल. वयाचा टप्पा ओलांडल्यानंतरही महक विविध आजारांपासून कशी दूर राहिली आणि तिच्या ‘डीएनए’मध्ये काही विशेष गुणधर्म आहेत का, याचा शोध वैज्ञानिक घेणार आहेत. महकचा जन्म २८ ऑगस्ट २००४ रोजी जयपूरच्या नाहरगड बायोलॉजिकल पार्कमध्ये झाला होता. तिने कधीही जंगलात आयुष्य घालवले नाही. असे असूनही, वयाच्या २४ व्या वर्षीही ती अत्यंत सक्रिय असून तिचे दात व पंजे मजबूत आहेत.
महकची बहीण ‘रंभा’ हिचा जन्मही तिच्यासोबतच झाला होता, मात्र सहा महिन्यांपूर्वी तिचा मृत्यू झाला. वन्यजीव अधिकाऱ्यांच्या मते, महकवरील या संशोधनामुळे देशातील इतर वयोवृद्ध वाघांची देखभाल अधिक चांगल्या प्रकारे करण्यास मदत होईल. तिचा आहार, उपचार, तणावमुक्त वातावरण आणि वैद्यकीय काळजी यांचा अभ्यास करून इतर वाघांना दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, हे समजणे सोपे जाईल. याशिवाय, तिच्या मानसिक आरोग्याचा आणि तणावमुक्त राहण्याच्या पद्धतीचा अभ्यास करून पिंजऱ्यात राहणाऱ्या इतर वन्यजीवांचे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल. अभेडा बायोलॉजिकल पार्क प्रशासन महकच्या जीवनावर एक माहितीपट तयार करण्याच्या तयारीत आहे.