

ब्राझीलिया : ब्राझील आणि पोर्तुगालच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे एका अशा विशेष ‘मॅग्नेटिक नॅनोमटेरिअल’ चा शोध लावला आहे, जे हाडांच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी क्रांती घडवू शकते. हे नवीन तंत्रज्ञान एकाच वेळी दोन महत्त्वाची कामे करते. पहिले म्हणजे कर्करोगाच्या पेशी नष्ट करणे आणि दुसरे म्हणजे कमकुवत झालेल्या हाडाला पुन्हा मजबुती मिळवून देणे.
शास्त्रज्ञांनी लोहाच्या ऑक्साईडपासून बनवलेले अत्यंत सूक्ष्म कण (नॅनो पार्टिकल्स) तयार केले आहेत. या कणांवर ‘बायोअॅक्टिव्ह ग्लास’चा एक अतिशय पातळ थर चढवण्यात आला आहे. या मटेरियलचा आतील भाग चुंबकीय आहे, तर बाहेरील थर हाडांशी घट्ट चिकटण्यास मदत करतो. ही अनोखी रचनाच या संशोधनाला विशेष बनवते. संशोधकांनी या नॅनोमटेरिअलची चाचणी शरीरातील द्रवासारख्या कृत्रिम द्रावणात केली. यावेळी असे दिसून आले की, हे मटेरियल अतिशय वेगाने ‘एपाटाईट’ नावाचे खनिज तयार करते. हे तेच खनिज आहे जे आपल्या शरीरातील हाडांचा मुख्य घटक असते.