cocaine addiction treatment | मॅजिक मशरूमच्या डोसने सुटू शकते कोकेनचे व्यसन!

cocaine addiction treatment |
cocaine addiction treatment | मॅजिक मशरूमच्या डोसने सुटू शकते कोकेनचे व्यसन!
Published on
Updated on

लंडन : कोकेनसारख्या अत्यंत घातक आणि जीवघेण्या अमली पदार्थाच्या विळख्यात अडकलेल्या व्यसनी लोकांसाठी वैद्यकीय क्षेत्रातून एक आशेचा किरण समोर आला आहे. मॅजिक मशरूममधील एका घटकाचा अवघा एक डोस कोकेनचे गंभीर व्यसन सोडवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकतो, असा दावा एका ताज्या संशोधनात करण्यात आला आहे. प्रसिद्ध जामा नेटवर्क ओपन या वैद्यकीय नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. सध्या जगात कोकेनचे व्यसन सोडवण्यासाठी कोणतेही मान्यताप्राप्त औषध उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत हे संशोधन अत्यंत क्रांतिकारी मानले जात आहे.

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ अलाबामाचे मुख्य संशोधक डॉ. पीटर हेंड्रिक्स यांच्या नेतृत्वाखाली 40 कोकेन युजर्सवर सुमारे 6 महिने हा अभ्यास करण्यात आला. संशोधकांनी रुग्णांचे दोन गट केले. एका गटाला मॅजिक मशरूममधील सक्रिय घटक असलेले सायलोसायबिन हे सायकेडेलिक औषध देण्यात आले, तर दुसर्‍या गटाला सामान्य अ‍ॅन्टीहिस्टामाइन देण्यात आले. दोन्ही गटांना लायसन्सधारक थेरपिस्टद्वारे मानसोपचार सत्रेही देण्यात आली.

चाचणीचे आश्चर्यकारक परिणाम

6 महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर असे दिसून आले की, ज्या रुग्णांना सायलोसायबिनचा अवघा एक डोस मिळाला होता, त्यांनी कोकेनपासून स्वतःला पूर्णपणे लांब ठेवण्यात मोठे यश मिळवले. या रुग्णांमध्ये पुन्हा व्यसनाकडे वळण्याचे प्रमाण खूपच कमी होते आणि त्यांचे दिवस कोकेनविना अत्यंत चांगले गेले. ‘कोकेनचे व्यसन मेंदूच्या विचार करण्याच्या पद्धतीवर ताबा मिळवते. सायलोसायबिन रुग्णाच्या मेंदूची चेतना आणि द़ृष्टीकोन बदलण्याचे काम करते, ज्यामुळे त्यांना स्वतःच्या वर्तनात सकारात्मक बदल करणे सोपे जाते.’, असे मुख्य संशोधक डॉ. पीटर हेंड्रिक्स यांनी सांगितले.

तज्ज्ञांचा सावधगिरीचा इशारा

कोकेनमुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचा धोका असतो. अशा काळात हे संशोधन आले असले, तरी क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट प्रोफेसर एरिन बोनार यांनी सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. त्यांच्या मते, कोकेन सोडताना रुग्णांमध्ये तीव्र नैराश्य येते, त्यावर हे औषध किती प्रभावी आहे, हे अद्याप पूर्णपणे सिद्ध झालेले नाही. तसेच, या उपचाराचा गैरवापर रोखण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक संतुलन राखणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news