

सतना : जगात शौकीन लोकांची कमतरता नाही, पण मध्य प्रदेशातील सतना येथे राहणाऱ्या 58 वर्षीय संजय विश्वकर्मा यांचा शौक ऐकून भल्याभल्यांना घाम फुटेल. सामान्य माणसाच्या तोंडात एखादा छोटा खडा किंवा अन्नाचा कण अडकला तरी तो अस्वस्थ होतो, मात्र संजय गेल्या 45 वर्षांपासून आपल्या तोंडात लोखंडी आणि पितळी टोकदार पिनांचा (सुयांचा) साठा घेऊन फिरत आहेत.
संजय यांच्या तोंडात प्रत्येक वेळी 150 पेक्षा जास्त पिना दबलेल्या असतात. जेवण करणे, पाणी पिणे, बोलणे असो किंवा रात्रीची गाढ झोप, या पिना त्यांच्या तोंडातून कधीही बाहेर पडत नाहीत. विशेष म्हणजे, इतक्या वर्षांत या पिनांनी त्यांना कोणतीही इजा पोहोचवलेली नाही. वैद्यकीय शास्त्रासाठी संजय हे एखाद्या चालत्या-फिरत्या आश्चर्यापेक्षा कमी नाहीत. संजय यांच्या ‘पिन मॅन’ बनण्यामागची गोष्टही तितकीच रंजक आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व वयाच्या 14 व्या वर्षी सुरू झाले. त्यांना पान खाण्याची खूप आवड होती. पान खाताना सुपारी वारंवार दातांमध्ये अडकायची. ती काढण्यासाठी ते सुरुवातीला काडीपेटीची काडी किंवा अगरबत्तीची काडी वापरायचे, पण ती वारंवार तुटायची. एके दिवशी वैतागून त्यांनी लाकडी काडीऐवजी लोखंडी पिन वापरली. हा उपाय त्यांना इतका सोयीचा वाटला की त्यांनी ती पिन तोंडातच ठेवायला सुरुवात केली. हळूहळू एका पिनपासून सुरू झालेला हा प्रवास आता 150 पिनांपर्यंत पोहोचला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, संजय यांच्या तोंडात पितळ, स्टील आणि लोखंडाच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या शेकडो पिना आहेत, पण त्यांनी आजपर्यंत बाजारातून एकही पिन विकत घेतलेली नाही. संजय सांगतात की, ‘मला जिथे कुठे पिन दिसते, तिथे मी ती उचलतो. मग ते शिंप्याचे दुकान असो, सरकारी कार्यालय असो किंवा एखाद्या ऑफिसचे टेबल; मी पिन उचलतो आणि थेट तोंडात टाकतो.‘ आता तर परिस्थिती अशी आहे की, लोक स्वतःहून त्यांना पिना आणून देतात. सध्या संजय यांचे तोंडच त्यांचा ‘पिन बॉक्स’ बनले आहे.