

अँटानानारिवो (मादागास्कर) : आकाशाच्या दिशेने पसरलेली मुळे आणि अजस्र खोड... अशा विलक्षण रूपामुळे जगभरात ‘अपसाईड डाऊन ट्री’ म्हणून ओळखले जाणारे बाओबाब वृक्ष नेहमी चर्चेत असतात. मादागास्कर बेटावर आढळणारे हे वृक्ष केवळ निसर्गाचा चमत्कार नसून ते या देशाच्या ओळखीचा मुख्य भाग बनले आहेत.
मादागास्करमधील ‘मोरोन्डावा’ भागात बाओबाब वृक्षांची एक मोठी रांग आहे, जिला ‘अॅव्हेन्यू ऑफ द बाओबाब्स’ म्हटले जाते. सुमारे 800 वर्षांहून अधिक जुने असलेले हे वृक्ष 30 मीटरपर्यंत उंच वाढतात. सूर्यास्ताच्या वेळी या वृक्षांचे द़ृश्य इतके विलोभनीय दिसते की, ते पाहण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक येथे गर्दी करतात. या वृक्षांच्या जाड खोडामध्ये हजारो लिटर पाणी साठवण्याची क्षमता असते. यामुळेच हे वृक्ष अत्यंत भीषण दुष्काळातही जिवंत राहू शकतात.
बाओबाब वृक्ष तब्बल 2,500 वर्षांहून अधिक काळ जगू शकतात. याच्या फळांमध्ये व्हिटॅमीन-सी भरपूर प्रमाणात असते. स्थानिक लोक याचा वापर अन्न आणि औषध म्हणून करतात. मादागास्करमधील लोक या वृक्षाला पवित्र मानतात. त्यांच्या लोककथेनुसार, देवाच्या कोपामुळे हे झाड उलटे लावले गेले होते, अशी त्यांची धारणा आहे. दुर्दैवाने, हवामान बदल आणि वाढत्या शहरीकरणामुळे या प्राचीन वृक्षांच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाले आहे. मादागास्करमधील बाओबाबच्या नऊ प्रजातींपैकी काही प्रजाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जागतिक पर्यावरण संस्थांकडून या वृक्षांच्या संवर्धनासाठी आता विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.