

बीजिंग : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन यांनी नुकताच चीनचा दौरा केला. या दौर्यादरम्यान, चिनी सरकारने फ्रान्सच्या फर्स्ट लेडीच्या सुरक्षेसाठी एक महिला अंगरक्षक तैनात केली होती. आता चीनमध्ये मॅक्रॉन यांच्या दौर्यापेक्षा ही चिनी बॉडीगार्ड अधिक चर्चेचा विषय बनली आहे. सुरक्षा देताना ही सुंदर अंगरक्षक अत्यंत सख्त आणि व्यावसायिक बॉडीगार्डप्रमाणेच दिसली, ज्यामुळे तिने इंटरनेटवर लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
चिनी वृत्तवाहिनी ‘द पेपर’ने या महिला बॉडीगार्डबद्दल माहिती दिली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांची पत्नी बीजिंग आणि चेंगदू येथे गेले होते, तेव्हा ब्रिजिट मॅक्रॉन ज्या-ज्या कार्यक्रमांना उपस्थित होत्या, त्या सर्व कार्यक्रमांमध्ये ही बॉडीगार्ड त्यांच्यासोबत होती. या महिला बॉडीगार्डचे सांकेतिक नाव ‘यान युएशिया’ (Yan Yuexia) असल्याचे सांगितले जात आहे. चीनमध्ये लोक तिला आतापर्यंतची सर्वात सुंदर बॉडीगार्ड म्हणून संबोधत आहेत. यान युएशिया ब्रिजिट मॅक्रॉन यांच्या आजूबाजूच्या वातावरणाचे सतत निरीक्षण करताना दिसली.
यान युएशिया यापूर्वी सप्टेंबर 2023 मध्ये चर्चेत आली होती. त्यावेळी ती सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांची पत्नी असमा अल असद यांच्या सुरक्षेत तैनात होती. आपल्या शांत, गंभीर आणि दक्ष वृत्तीमुळे ती खूप चर्चेत आली होती. बीजिंगमधील एका युनिव्हर्सिटी कार्यक्रमात ती असमा यांच्या अगदी जवळ राहून त्यांना विद्यार्थी आणि पत्रकारांच्या गर्दीपासून वाचवताना दिसली होती. कोणी जवळ येताच ती भिंत बनून उभी राहत होती.
तिच्या गंभीर नोकरीमुळे यानबद्दल वैयक्तिक माहिती फार कमी उपलब्ध आहे. परंतु, काही मीडिया रिपोर्टस्नुसार तिचे खरे नाव शू जिन आहे. तिचा जन्म मध्य चीनमधील हेनान प्रांतातील लुओयांग शहरात झाला. ती मार्शल आर्टस्ची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून येते. युएशियाने वयाच्या 6 व्या वर्षापासून मार्शल आर्टस्ला सुरुवात केली होती आणि एकदा तिने यात 5 जपानी कराटे चॅम्पियनलाही हरवले होते. यान केवळ चिनी नेत्यांचीच नव्हे, तर चीनच्या दौर्यावर आलेल्या विदेशी नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारीदेखील यशस्वीरीत्या सांभाळते.