Floating Luxury Car | पाण्यावर तरंगणारी आलिशान कार

Floating Luxury Car |
Floating Luxury Car | पाण्यावर तरंगणारी आलिशान कार
Published on: 
Updated on: 

बीजिंग : प्रमुख चिनी इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी BYD ने आपल्या 'यांगवांग' या लक्झरी ब्रँडअंतर्गत जगातील पहिली अशी उत्पादन-आधारित एसयूव्ही 'यांगवांग U8' सादर करून ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिलेली आहे. ही केवळ एक आलिशान ऑफ-रोड गाडी नसून, पुरासारख्या आपत्कालीन परिस्थितीत चक्क पाण्यावर बोटीप्रमाणे तरंगण्याची आणि पुढे सरकण्याची अद्भुत क्षमता या गाडीत आहे.

अनेकदा पूर किंवा मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय होतात आणि वाहने पाण्यात अडकून अपघात होतात. ही समस्या लक्षात घेऊन BYD ने या कारमध्ये खास 'इमर्जन्सी फ्लोटिंग मोड' विकसित केला आहे. गाडी एका ठरावीक पातळीपेक्षा जास्त खोल पाण्यात गेल्यास त्यातील सेन्सर्स आपोआप सक्रिय होतात. या प्रक्रियेत गाडीचे इंजिन बंद होते, सर्व खिडक्यांच्या काचा वर चढतात आणि प्रवाशांना सुरक्षित बाहेर पडता यावे यासाठी सनरूफ उघडले जाते. ही एसयूव्ही पाण्यात न बुडता सलग ३० मिनिटे पाण्यावर तरंगू शकते आणि या काळात गाडीच्या केबिनमध्ये पाणी शिरत नाही.

इतकेच नव्हे, तर चारही चाकांच्या स्वतंत्र मोटर्सच्या मदतीने ही कार पाण्यावर तरंगताना ताशी ३ किलोमीटर वेगाने पुढे जाऊ शकते आणि सुरक्षित ठिकाणी वळवताही येते. मात्र, हे फीचर जलक्रीडा किंवा नदी पार करण्यासाठी नसून केवळ पूर आणि आणीबाणीच्या प्रसंगी जीव वाचवण्यासाठी दिले असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. तांत्रिक क्षमतेचा विचार केल्यास ही कार अत्यंत शक्तिशाली आहे. यामध्ये चार स्वतंत्र इलेक्ट्रिक मोटर्स आणि २.० लिटर टर्बो पेट्रोल रेंज-एक्स्टेंडर इंजिन देण्यात आले असून, त्यातून एकूण १,१९७ अश्वशक्ती (HP) आणि १,२८० Nm इतकी प्रचंड ताकद निर्माण होते.

अवघ्या ३.६ सेकंदांत ही गाडी शून्य ते १०० किमी प्रतितास वेग गाठते आणि तिचा कमाल वेग २०० कि.मी. प्रतितास इतका आहे. पूर्ण चार्जिंग आणि इंधन टाकी भरलेली असल्यास ही एसयूव्ही तब्बल १,००० किलोमीटरपर्यंतचा पल्ला गाठू शकते, तर केवळ बॅटरीवर १८० किलोमीटर धावण्याची तिची क्षमता आहे. याशिवाय गाडी जागेवरच ३६०-अंश फिरवणारे 'टँक टर्न' तंत्रज्ञान, थर्मल कॅमेरा, सॅटेलाइट फोन आणि २२ स्पीकर्सची प्रगत साउंड सिस्टीम यांसारखी आधुनिक वैशिष्ट्ये यात समाविष्ट आहेत. चीनच्या बाजारपेठेत 'यांगवांग U8' च्या स्टँडर्ड प्रीमियम आवृत्तीची किंमत सुमारे १.०९ दशलक्ष युआन, म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे १.२५ ते १.३० कोटी रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.