

वॉशिंग्टन : नासाच्या ‘ल्यूसी’ अंतराळ यानाने नुकतेच एका विचित्र आकाराच्या, 15 कोटी वर्षे जुन्या लघुग्रहाचे पहिले हाय-रिझोल्युशन छायाचित्र घेतले आहे. ‘डोनाल्डजोहान्सन’ नावाचा हा लघुग्रह दोन लहान खडकांच्या धडकेतून तयार झाला असून, त्याचा आकार मधून अरुंद आणि दोन्ही टोकांना मोठे भाग असलेला म्हणजे अगदी शेंगदाण्यासारखा आहे, ज्यातील एक दाणा दुसर्यापेक्षा मोठा आहे.
ल्यूसीने 20 एप्रिल रोजी या लघुग्रहाच्या अवघ्या 600 मैल (960 कि.मी.) अंतरावरून उड्डाण केले, जे अंदाजे मोंटाना राज्याच्या रुंदीइतके आहे. यावेळी या प्राचीन अवकाश खडकाचे तपशीलवार फोटो घेण्यात आले. ‘डोनाल्डजोहान्सन’वर दिसणारी गुंतागुंतीची भूमिगत रचना खूपच आकर्षक आहे, असे नासाचे प्रमुख संशोधक हॅल लेव्हिसन यांनी सांगितले. या रचनांचे बारकाईने निरीक्षण केल्यास आपल्या सौरमालेतील ग्रहांची निर्मिती कशी झाली, याची महत्त्वाची माहिती मिळेल.
2021 मध्ये प्रक्षेपित केलेले ‘ल्यूसी’ यान मुख्यतः ‘ट्रोजन’ नावाच्या प्राचीन लघुग्रहांचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. हे लघुग्रह सौरमालेतील गुरू ग्रहाच्या कक्षेत दोन गटांमध्ये फिरतात आणि त्यांचे वय अब्जावधी वर्षांचे आहे, डोनाल्डजोहान्सनपेक्षा खूपच जुने. त्यामुळे हे ट्रोजन क्षुद्रग्रह सौरमालेतील ग्रहांसारख्या पदार्थांनी बनलेले असण्याची शक्यता आहे, ज्यातून आपल्या सौरमालेच्या सुरुवातीबाबत अधिक माहिती मिळू शकते.
डोनाल्डजोहान्सन हा लघुग्रह मुख्य लघुग्रह पट्ट्यात, मंगळ आणि गुरू यांच्या दरम्यान सूर्याभोवती फिरतो. याचे अंतर साधारणतः 180 ते 260 दशलक्ष मैलांच्या दरम्यान असते. याची लांबी सुमारे 5 मैल (8 कि.मी.) आणि रुंदी 2 मैल (3.5 कि.मी.) असल्याचा अंदाज आहेत, जे ल्यूसीच्या मुख्य लक्ष्य असलेल्या ट्रोजन क्षुद्रग्रहांपेक्षा लहान आहे. उदाहरणार्थ, ल्यूसीचे पहिले ट्रोजन लक्ष्य ‘युरीबेटस्’ सुमारे 40 मैल (64 कि.मी.) रुंद आहे.
या लघुग्रहाचे नाव प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ डोनाल्ड जोहान्सन यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे, ज्यांनी 1974 मध्ये त्यांच्या विद्यार्थ्याबरोबर ‘ल्यूसी’ नावाचा ऑस्ट्रालोपिथेकस जीवाश्म शोधला होता, जो मानवाच्या उत्क्रांतीचा एक महत्त्वाचा पुरावा मानला जातो. नासाने या मिशनला ‘ल्यूसी’ असे नाव दिले. कारण, जसे त्या जीवाश्मामुळे मानवाचा इतिहास उलगडला, तसेच हे यान सौरमालेच्या सुरुवातीचा इतिहास उलगडण्याचे काम करेल, अशी आशा आहे.