

श्रीनगर : काश्मीर खोर्यातील प्रसिद्ध वुलर सरोवराच्या सौंदर्यात आजकाल एका नव्या गुलाबी रंगाची भर पडली आहे. सकाळच्या वेळी कमळाच्या मोठ्या पानांवरून ओघळणारे दवबिंदू आणि पाण्यावर डौलाने तरंगणारी गुलाबी कमळं... हे मनमोहक द़ृश्य तब्बल तीन दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा जिवंत झाले आहे. प्रदूषण आणि गाळामुळे उजाड झालेल्या या सरोवरात पुन्हा कमळं फुलली आहेत. ‘वुलर’मधील ही कमळं केवळ एक निसर्गरम्य द़ृश्य नाही, तर ती एका यशस्वी पर्यावरण संवर्धनाच्या लढ्याची गाथा सांगताना दिसत आहेत.
एकेकाळी आशियातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याच्या सरोवरांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्या वुलर सरोवराला मानवी हस्तक्षेपामुळे द़ृष्ट लागली. वाढती लोकसंख्या आणि शेतीच्या चुकीच्या पद्धतींमुळे सरोवरात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोहोचले होते. कमळाच्या वाढीसाठी कमी फॉस्फरसची आवश्यकता असते; पण प्रदूषणाने हे संतुलन बिघडवले. त्यातच पुराच्या पाण्यासोबत वाहून येणार्या गाळामुळे तलावाची खोली कमी झाली आणि कमळाची रोपं तग धरू शकली नाहीत.
1992 मध्ये झेलम नदीला आलेल्या महापुरानंतर येथील कमळं पूर्णपणे नाहीशी झाली होती. त्यानंतर या सरोवराला प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेे. 2014 मध्ये काश्मीरमध्ये आलेल्या महापुरानंतर सरोवरातील गाळ काढण्याच्या कामाला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली. त्याचेच हे सकारात्मक परिणाम आज दिसत आहेत. जम्मू आणि काश्मीर वन्यजीव विभागाच्या नोंदीनुसार, 1911 मध्ये वुलर सरोवराचे क्षेत्रफळ 217.8 चौरस किलोमीटर होते, जे 2007 पर्यंत कमी होऊन केवळ 86.71 चौरस किलोमीटरवर आले. यापैकी बहुतांश भागाचे शेतजमिनीत रूपांतर झाले, ज्यामुळे सरोवराचा परिसर आणि जैवविविधता धोक्यात आली होती.