

वॉशिंग्टन : ‘नासा’च्या क्युरिऑसिटी रोव्हरने मंगळावर आतापर्यंत आढळलेले सर्वात लांब रेणू शोधून काढले असून, हा शोध प्राचीन जीवनाच्या अस्तित्वाचे संकेत असू शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. 3.7 अब्ज वर्षे जुना खडक, जो येलोनाईफ बे नावाच्या एका कोरड्या पडलेल्या तलावातून गोळा करण्यात आला, त्यामध्ये 12 कार्बन अणूंनी बनलेल्या लांब रेणूंची साखळी आढळली. या शोधाचा अहवाल 24 मार्च रोजी ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ या शास्त्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला.
या कार्बन साखळ्या ‘फॅटी अॅसिडस्’पासून निर्माण झाल्या असाव्यात, असा संशोधकांचा अंदाज आहे. पृथ्वीवर हे फॅटी अॅसिडस् प्रामुख्याने जैविक क्रियेमुळे तयार होतात. जरी अशा रेणूंचे जैविक नसलेले स्रोत असू शकतात, तरीही त्यांच्या उपस्थितीचा अर्थ असा होतो की मार्सच्या मातीमध्ये प्राचीन जीवनाचे रासायनिक ठसे आजही आढळू शकतात. ‘जेव्हा हे नाजूक, रेषीय रेणू अजूनही 3.7 अब्ज वर्षांनंतर मंगळाच्या पृष्ठभागावर अस्तित्वात आहेत, तेव्हा हे निश्चितपणे सांगता येते की, जर मंगळावर जीवन उद्भवले असेल, तर त्याचे रासायनिक पुरावे आजही सापडू शकतात,’ असे या अभ्यासाच्या सहलेखिका आणि फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चमधील विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ कॅरोलिन फ्रेइसिनेट यांनी सांगितले. हे रेणू म्हणजे डेकन (10 कार्बन), अनडेकेन (11 कार्बन) आणि डोडेकेन (12 कार्बन) असून, ते क्युरिऑसिटी रोव्हरच्या सॅम्पल अॅनालिसिस अॅट मार्स (डअच) या उपकरणाद्वारे शोधले गेले. क्युरिऑसिटी 2012 मध्ये गेल क्रेटर या 154 कि.मी. रुंद उल्कापिंडाच्या धडकेने तयार झालेल्या खड्ड ्यात उतरले. त्यानंतर रोव्हरने 32 कि.मी.चा प्रवास करत माऊंट शार्प आणि येलोनाईफ बेसारख्या ठिकाणी संशोधन केले. 2013 मध्ये कंबरलँड नावाच्या ठिकाणाहून घेतलेला खडकाचा नमुना या नव्या संशोधनासाठी वापरण्यात आला होता. पूर्वीच्या अभ्यासांमध्ये हा नमुना मातीतील चिकणमाती, सल्फर आणि नायट्रेटस्मध्ये समृद्ध असल्याचे दिसले होते.
या रेणूंचा शोध एक अपघाती यश ठरले. शास्त्रज्ञ मूळतः या नमुन्यामध्ये प्रथिनांचे मूलघटक, अमिनो अॅसिडस् शोधत होते. त्यासाठी त्यांनी एक नवीन पद्धत वापरली, नमुन्याला 1,1000 उ पर्यंत गरम करून त्यातील ऑक्सिजन बाहेर काढल्यानंतर विश्लेषण केले. अमिनो अॅसिडस् सापडले नाहीत, पण त्या प्रक्रियेत फॅटी रेणू दिसून आले. ‘जेव्हा मी स्पेक्ट्रमवर हे पीक्स पाहिले, तेव्हा मी खूप उत्साहित झाले,’ असे फ्रेइसिनेट म्हणाल्या. ‘हे आश्चर्यचकित करणारे होते कारण हा नमुना आम्ही अनेक वेळा तपासला होता, पण आता आम्ही नवीन रणनीती वापरली आणि म्हणूनच नवे परिणाम मिळाले.’ संशोधकांचा अंदाज आहे की हे रेणू अनडेकेनोईक अॅसिड, डोडेकेनोईक अॅसिड, आणि ट्रायडेकेनोईक अॅसिड या फॅटी अॅसिडस्पासून तुटून तयार झाले असावेत. ही अॅसिडस् म्हणजे कार्बन-हायड्रोजन साखळी असून शेवटी - उजजक समूह असतो. या शोधामुळे मंगळावरील संभाव्य प्राचीन जैविक क्रियेचे आणखी एक दालन उघडले आहे. अजून तरी ठोस पुरावे सापडलेले नाहीत, पण हे एक महत्त्वाचे पाऊल निश्चितच आहे.