

न्यूयॉर्क : ज्यांना कोरोनानंतर दीर्घकाळ ब्रेन फॉग (स्मृती मंदावणे), डोकेदुखी किंवा चव-गंध न येणे असे त्रास होत आहेत, त्यांच्यामध्ये भविष्यात अल्झायमरचा धोका वाढू शकतो, असा दावा अमेरिकन संशोधकांनी केला आहे. त्यांनी केलेल्या चाचणी आणि संशोधनातून विविध निष्कर्ष काढले आहेत. लाँग कोव्हिड रुग्णांमध्ये संशोधकांना टाऊ प्रोटीन आढळले. या प्रथिनाला अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश निर्माण करण्यासाठी जबाबदार मानले जाते.
संशोधकांनी आपल्या संशोधनात लॉन्ग कोव्हिडच्या 225 हून अधिक रुग्णांच्या रक्ताची तपासणी केली. त्यांच्यामध्ये टाऊ नावाच्या प्रथिनाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेले आढळले. हे प्रथिन अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश निर्माण करण्यासाठी जबाबदार मानले जाते. या प्रथिनामुळे मेंदूच्या पेशींवर परिणाम होतो. मेंदूतील मज्जातंतूच्या पेशींमध्ये या प्रथिनांचे गुच्छ तयार होतात, ज्यामुळे पेशींमधील संवाद विस्कळीत होतो आणि स्मृती कमी होऊ लागते. ज्यांना कोव्हिडनंतर डोकेदुखी, चक्कर येणे किंवा विचार करण्याच्या क्षमतेत अडथळे येत होते, त्यांच्या रक्तातील टाऊ पातळीत तब्बल 60 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले.
ब्रेन फॉग : एकाग्रता कमी होणे किंवा गोष्टी चटकन आठवण्यास त्रास होणे
सततची डोकेदुखी आणि चक्कर येणे
गंध आणि चवीत बदल : हा बदल दीर्घकाळ टिकून राहणे
अति थकवा आणि तोल जाणे
संशोधक डॉ. बेंजामिन लुफ्ट यांच्या मते, कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अनेक वर्षांनी त्याचे परिणाम दिसून येऊ शकतात. हा अभ्यास सूचित करतो की, विषाणूंमुळे मेंदूमध्ये प्रथिनांची असामान्य निर्मिती होऊ शकते, ज्यामुळे कालांतराने अल्झायमरसारखे आजार बळावू शकतात. प्राध्यापक शॉन क्लाउस्टन यांनी स्पष्ट केले की, रक्तातील वाढलेली टाऊ पातळी हे मेंदूला झालेल्या कायमस्वरूपी नुकसानीचे लक्षण असू शकते.
सध्या ब्रिटनमध्ये सुमारे 9.8 लाख लोक अल्झायमरने ग्रस्त आहेत, ही संख्या 2040 पर्यंत 14 लाखांवर जाण्याचा अंदाज आहे.