लंडन :
एखाद्या व्यक्तीच्या लघवीचा रंग पिवळसर होऊ शकतो हे आपल्याला माहिती आहे; पण कधी कुणाचे मूत्र चक्क हिरवट रंगाचे झाले आहे असे आपल्या ऐकिवातही नसेल. तसा प्रकार इंग्लंडमधील 62 वर्षांच्या एका रुग्णाबाबत घडला. हा माणूस 'क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज' (सीओपीडी) ने ग्रस्त आहे. हा फुफ्फुसांचा एक बळावलेला गंभीर आजार आहे. या माणसाची लघवी अशी हिरवट झाल्याचे दिसून आले!
याबाबतची माहिती 'द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन' मध्ये देण्यात आली आहे. या माणसाला श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्या रक्तात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण अधिक होते. अशी स्थिती जीवघेणी ठरू शकते. त्याला अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. व्हेंटिलेटरवर ठेवून त्याला 'प्रोपोफोल' नावाचे सामान्य अॅनास्थेटिक देण्यात आले. पाच दिवसांनंतर रुग्णाची लघवी हलक्या हिरव्या रंगाची झाली. कॅथेटर बॅगमध्ये अशी हिरवी लघवी पाहून सगळेच चकीत झाले. अशी हिरवी लघवी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यामध्ये औषधांचा साईड इफेक्ट, विशिष्ट संक्रमण आणि यकृताची समस्या यांचा समावेश होतो. या माणसाची लघवी प्रोपोफोलमुळे हिरवी झाल्याचे आढळून आले!