

इस्तंबुल : जगज्जेत्या अलेक्झांडरने प्राचीन पर्शियन लोकांशी ज्याठिकाणी युद्ध केले होते, त्या युद्धभूमीचा आता शोध लावण्यात आला आहे. पर्शियन साम्राज्याविरुद्ध ‘अलेक्झांडर द ग्रेट’ याने जे ग्रॅनिकसचे युद्ध लढले त्या ठिकाणाची संशोधकांना ओळख पटली आहे. हे ठिकाण वायव्य तुर्कीमधील बिगा शहरापासून उत्तरेला दहा किलोमीटरवर आहे. इसवी सनपूर्व 334 या वर्षी अलेक्झांडरच्या सैन्याने याच युद्धभूमीवर पर्शियन सैन्याचा पराभव केला होता.
या युद्धातील विजयामुळे अलेक्झांडरला पर्शियन साम्राज्यात पाय रोवण्यास मदत मिळाली होती. तसेच या विजयामुळेच त्याचे सैन्य मध्यपूर्वेत अधिक आतपर्यंत घुसू शकले होते. कॅनाक्कले ओन्सेकिझ मार्ट युनिव्हर्सिटीतील पुरातत्त्व विभागाचे प्राध्यापक रेहान कॉर्पे यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने हे संशोधन केले. रेहान कॉर्पे यांनी सांगितले की, ग्रॅनिकसचे युद्ध हे अलेक्झांडरच्या जीवनातील एक महत्त्वाचा ‘टर्निंग पॉईंट’ ठरले होते. याच युद्धामुळे नंतरच्या काळात त्याच्या नावापुढे ‘द ग्रेट’ हे बिरुद लागले. हे युद्ध यामुळेच महत्त्वाचे आहे असे नाही. या युद्धाचे तत्कालीन जगावर परिणाम झाले, तसेच हे युद्ध म्हणजे जगाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पाही ठरले. 19 व्या शतकात हेनरीच किपर्ट या पुरातत्त्व संशोधकाने या भागात संशोधन केले होते. हेच या युद्धाचे ठिकाण असावे, असे त्यांनीही त्यावेळी म्हटले होते. मात्र आता त्याची पुष्टी करणारे पुरावे नव्या संशोधनातून समोर आले आहेत. याठिकाणी हर्मैओन नावाच्या प्राचीन शहराचे अवशेष सापडले, ज्याचा उल्लेख प्राचीन नोंदींमध्ये आहे. सध्या ग्रॅनिकस नदीचे पात्र अलेक्झांडरच्या काळापेक्षा थोडे बदलले आहे. मात्र अनेक गोष्टी तशाच आहेत.