Pigeon Navigation | कबुतरांना दिशा शोधण्यासाठी होते यकृताची मदत

शास्त्रज्ञांनी शोधला इनबिल्ट होकायंत्राचा रहस्यमय मार्ग
Pigeon Navigation |
Pigeon Navigation | कबुतरांना दिशा शोधण्यासाठी होते यकृताची मदत
Published on
Updated on

बॉन (जर्मनी) : कबुतर किंवा स्थलांतर करणारे पक्षी मैलोन्मैल प्रवास करूनही आपल्या घरट्याचा अचूक रस्ता कसा शोधतात, हे गुपित अखेर शास्त्रज्ञांनी उलगडले आहे. एका नवीन संशोधनानुसार, कबुतरांच्या यकृतामध्ये (लिव्हर) काही विशिष्ट रोगप्रतिकारक पेशी (इम्युन सेल्स) असतात, ज्या पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला (मॅग्नेटिक फिल्ड) ओळखू शकतात. या पेशी पक्ष्यांसाठी शरीरांतर्गत होकायंत्र (इंटरनल कंपास) म्हणून काम करतात. प्रसिद्ध ‘सायन्स’ या मासिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

यकृतातील मॅक्रोफेजेस पेशींचा खेळ

जर्मनीच्या बॉन विद्यापीठातील संशोधक क्लिव्हिया लिसोव्स्की आणि त्यांच्या पथकाने कबुतरांच्या शरीरातील चुंबकीय पेशींचा शोध घेतला. त्यांना आढळले की, यकृतातील मॅक्रोफेजेस नावाच्या पेशी जुन्या तांबड्या रक्तपेशी नष्ट करतात, ज्यामुळे त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर लोहाचा (आयर्न) साठा जमा होतो. या लोहामुळे पेशींमध्ये एक विशिष्ट चुंबकीय गुणधर्म (सुपर पॅरामॅग्नेटिझम) तयार होतो. जेव्हा कबुतर उडतात, तेव्हा हे लोहाचे नॅनोकण पृथ्वीच्या चुंबकीय रेषेच्या समांतर येतात आणि मॅग्नेटाईज होतात. त्यामुळे कबुतरांना दिशेची अचूक जाणीव होते.

संशोधकांनी 20 किलोमीटरहून अधिक दूरवरून आपल्या घरट्याकडे परतण्याचे प्रशिक्षण मिळालेल्या कबुतरांवर प्रयोग केला. ज्या कबुतरांच्या यकृतातील या मॅक्रोफेजेस पेशी काढून टाकल्या होत्या, ती कबुतरे ढगाळ हवामानात रस्ता भरकटली. मात्र, जेव्हा ऊन पडले होते, तेव्हा त्यांनी सूर्याच्या दिशेचा अंदाज घेऊन घरटे शोधले. यावरून सिद्ध होते की, पक्षी दिशा शोधण्यासाठी चुंबकीय क्षेत्र आणि सूर्य या दोन्हीचा वापर करतात. शास्त्रज्ञांच्या मते, यकृतातील या मॅक्रोफेजेस पेशी मज्जातंतूंच्या (नर्व्ह फायबरस) संपर्कात असतात, ज्यामुळे चुंबकीय माहिती थेट मेंदूपर्यंत पोहोचते. हेच तंत्रज्ञान रात्री प्रवास करणारे पक्षी, वटवाघुळ आणि समुद्रातील मासे (शार्क) यांना अंधारात दिशा शोधण्यास मदत करत असावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news