Woman Brain 3 Inch Worm | महिलेच्या मेंदूत आढळली 3 इंचांची जिवंत कृमी

ऑस्ट्रेलियातील वैद्यकीय इतिहासातील पहिलीच घटना
Woman Brain 3 Inch Worm |
Woman Brain 3 Inch Worm | महिलेच्या मेंदूत आढळली 3 इंचांची जिवंत कृमी
Published on
Updated on

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्समधून एक अत्यंत दुर्मीळ आणि धक्कादायक वैद्यकीय घटना समोर आली आहे. एका 64 वर्षीय महिलेच्या मेंदूत डॉक्टरांना चक्क 3 इंच लांबीची एक जिवंत लाल गोलकृमी (Roundworm) सापडली आहे. गेल्या वर्षभरापासून ही महिला विविध आजारांशी झुंज देत होती, ज्याचे मूळ कारण शोधण्यात डॉक्टरांना मोठे यश आले आहे.

या प्रकरणाची सुरुवात तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पोटदुखी आणि जुलाबाने झाली. यासोबतच महिलेला अनेक प्रकारचा त्रास होत होता. त्यामध्ये सतत येणारा कोरडा खोकला आणि रात्री येणारा घाम ही समस्याही होती. सीटी स्कॅनमध्ये फुफ्फुस, यकृत आणि प्लिहामध्ये जखमा दिसून आल्या. सुरुवातीला डॉक्टरांनी याला ‘इओसिनोफिलिक न्यूमोनिया’ समजून स्टिरॉईडस्द्वारे उपचार सुरू केले होते. काही महिने उपचार घेऊनही महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. उलट, तिला ताप आणि खोकल्याचा त्रास पुन्हा जाणवू लागला. विविध चाचण्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरिया किंवा बुरशीजन्य संसर्ग आढळले नाहीत.

परदेश प्रवासाचा इतिहास असल्याने तिला जंतनाशक औषधेही देण्यात आली. परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सुमारे एक वर्षानंतर, महिलेला विस्मरण आणि नैराश्याचा त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी जेव्हा तिच्या मेंदूचा एमआरआय केला, तेव्हा उजव्या बाजूला एक जखम दिसून आली. या जखमेची तपासणी करण्यासाठी जेव्हा शस्त्रक्रिया (Biopsy) करण्यात आली, तेव्हा डॉक्टरही चकित झाले. ‘शस्त्रक्रियेदरम्यान मेंदूत एक दोरीसारखी रचना दिसली, जो प्रत्यक्षात 3 इंच लांब आणि 1 मि.मी. जाड असलेला एक जिवंत लाल रंगाची परजीवी कृमी (Helminth) होता.’

शस्त्रक्रियेद्वारे ती कृमी बाहेर काढल्यानंतर महिलेवर विशेष औषधोपचार करण्यात आले. तसेच, आयव्हरमेक्टिन आणि अल्बेंडाझोल यांसारख्या जंतनाशक औषधांचा डोस देण्यात आला. शस्त्रक्रियेच्या सहा महिन्यांनंतर महिलेच्या फुफ्फुसातील आणि यकृतातील जखमा पूर्णपणे बर्‍या झाल्या असून, तिची मानसिक प्रकृतीही सुधारली आहे. ही घटना वैद्यकीय क्षेत्रासाठी एक मोठा धडा मानली जात आहे. कारण, हा विशिष्ट प्रकारचा परजीवी मानवी मेंदूत सापडण्याची ही पहिलीच वेळ असावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news