Live Birth Evolution | अंड्यांऐवजी थेट पिल्लांना जन्म देण्याची पद्धत अनुमानापेक्षा तब्बल ९ कोटी वर्षे आधीची!

Live Birth Evolution |
Live Birth Evolution | अंड्यांऐवजी थेट पिल्लांना जन्म देण्याची पद्धत अनुमानापेक्षा तब्बल ९ कोटी वर्षे आधीची!
Published on
Updated on

वॉशिंग्टनः सुमारे २३ कोटी ६० लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेला आणि कुत्र्याच्या आकाराचा एक मांसभक्षी प्राणी थेट पिल्लांना जन्म देत असावा, असा नवा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. याचा अर्थ, आईच्या शरीरातच पिल्लांची वाढ करून त्यांना जन्म देण्याची पद्धत (Viviparity) सस्तन प्राण्यांच्या पूर्वजांमध्ये वैज्ञानिक अंदाजापेक्षा तब्बल ९० ते ९५ दशलक्ष (९ ते ९.५ कोटी) वर्षे आधीच सुरू झाली असावी.

१३ ऑगस्ट रोजी ‘फ्रंटियर्स इन मॅमल सायन्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. अर्जेंटिनाच्या नॅशनल सायंटिफिक अँड टेक्निकल रिसर्च कौन्सिलचे अश्मीभूत अवशेषशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक लिओनार्डो गेटानो म्हणाले, “सस्तन प्राण्यांचे हे प्राचीन पूर्वज पिल्लांना जन्म कसे देत असत, याचा पुरावा आपल्याला पहिल्यांदाच मिळाला आहे.” सस्तन प्राणी आणि त्यांचे नामशेष झालेले पूर्वज ‘सायनोडॉन्टिया’ (Cynodontia) या जीवसमूहाशी संबंधित आहेत. हा समूह २५२ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या मोठ्या महाविनाशानंतर अधिक विकसित झाला.

सध्याच्या वायव्य अर्जेंटिना भागात राहणाऱ्या ‘चिनिक्वोडॉन थिओटो निक्युसिस’ (Chiniquodon theotonicusis) नावाच्या कुत्र्याच्या आकाराच्या मांसभक्षी प्राण्याच्या अश्मीभूत हाडामध्ये संशोधकांना वाढीची एक विचित्र खूण आढळली. जिवंत प्राण्यांच्या अभ्यासावरून ही खूण म्हणजे हाडांमधील ‘नेओनेटल लाईन’ असल्याचे स्पष्ट झाले. जन्म होताच किंवा अंड्यातून बाहेर पडताच प्राण्याच्या शरीराची वाढ अचानक वेगाने होते, तेव्हा हाडांवर ही खूण तयार होते. लीओनार्डो गेटानो यांनी सांगितले, “जेव्हा तुम्ही अंड्यात किंवा आईच्या पोटात असता, तेव्हा जागा कमी असल्याने तुमची वाढ खूप हळू होते. पण जन्म झाल्यावर किंवा अंड्यातून बाहेर आल्यावर पुरेशी जागा मिळाल्याने शरीराची वाढ अचानक अत्यंत वेगाने होऊ लागते.”

हा प्राणी कसा जन्माला आला असावा हे शोधण्यासाठी, टीमने ‘नेओनेटल लाईन’ आणि प्रौढ चिनिक्वोडॉनच्या हाडांच्या आकाराचे मोजमाप केले. त्यावरून असे दिसून आले की या प्राण्यांचे प्रौढ वयातील वजन सुमारे १२ किलोग्रॅम (२६ पाउंड) होते. तर जन्माच्या वेळी पिल्लाचे वजन सुमारे १.७ किलोग्रॅम (३.७ पाउंड) असावे म्हणजेच प्रौढ वजनाच्या १४ टक्के. एवढ्या मोठ्या आकाराचे पिल्लू अंड्यात राहणे अशक्य असल्याने, हा प्राणी अंडी न घालता थेट बाळाला जन्म देत होता, असा मजबूत निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. सस्तन प्राण्यांच्या उत्क्रांतीचा इतिहास समजून घेण्यासाठी हा शोध अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news