

वॉशिंग्टन ः मंगळाच्या अंतर्गत हालचालींच्या अभ्यासातून एक धक्कादायक शोध लागला आहे. मंगळाच्या पृष्ठभागाखालच्या थरांमध्ये महासागराएवढ्या प्रमाणात द्रव स्वरूपातील पाणी लपलेले असू शकते, असे सिस्मिक (भूकंपीय) पुरावे सूचित करतात. 25 एप्रिल 2025 रोजी ‘नॅशनल सायन्स रिव्ह्यू’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या नव्या अभ्यासानुसार, या रेड प्लॅनेटच्या आतून निघालेल्या भूकंपीय लाटांच्या निरीक्षणातून असे दिसून आले आहे की, मंगळाच्या पृष्ठभागाखाली 5.4 ते 8 किलोमीटर (अंदाजे 3.4 ते 5 मैल) दरम्यानच्या थरांमध्ये द्रव स्वरूपातील पाण्याचा थर असू शकतो.
या लपलेल्या पाण्याचे एकूण प्रमाण एवढे मोठे असू शकते की, ते संपूर्ण मंगळा ग्रहावर 520 ते 780 मीटर (1,700 ते 2,560 फूट) खोल समुद्र तयार करू शकते, जे अंटार्क्टिकामधील बर्फाच्या थरातील पाण्याच्या प्रमाणाइतके आहे, असे संशोधकांचे अनुमान आहे. मंगळावर पूर्वी भरपूर पाणी होते. सुमारे 4.1 अब्ज वर्षांपूर्वी ते 3 अब्ज वर्षांपूर्वीपर्यंत, हा ग्रह खूपच ओलसर व जलयुक्त होता. त्यावर सापडलेली खाचाखोचांची जाळी, डेल्टा संरचना आणि थरांतील गाळ खडक हे सर्व दीर्घकालीन पाण्याच्या प्रवाहाचे संकेत देतात. परंतु कालांतराने मंगळाने त्याचे चुंबकीय क्षेत्र गमावले आणि सूर्याच्या किरणांनी त्याचा वातावरणाचा नाश करायला सुरुवात केली. वातावरण पातळ झाल्याने तापमान घसरले आणि त्यामुळे पृष्ठभागावरील पाणी बाष्परूपात अवकाशात गेले, बर्फात रूपांतरित झाले किंवा खडकांमध्ये ‘हायड्रेटेड मिनरल्स’ स्वरूपात अडकून राहिले; पण हे सर्व प्रकार मंगळावरील सर्व पाण्याच्या अनुपस्थितीचे स्पष्टीकरण देत नाहीत. मोठ्या प्रमाणात ’गायब’ पाण्याबाबत संशोधक अनेक वर्षांपासून गोंधळात होते. या नवीन अभ्यासाने मात्र या गूढ प्रश्नावर उत्तर मिळवण्यास हातभार लावला आहे.
नासाच्या ‘इनसाईट’ लँडरने 2018 मध्ये मंगळावर उतरल्यानंतर गोळा केलेल्या भूकंपीय डेटाचा वापर करून संशोधकांनी हा अभ्यास केला. 2021 आणि 2022 मध्ये झालेले ‘मार्सक्वेक्स’ व उल्कापातांच्या स्फोटातून निर्माण झालेल्या सिस्मिक लाटांचे विश्लेषण करताना असे दिसून आले की, पृष्ठभागाखाल 5 ते 8 किलोमीटरच्या दरम्यान लाटा मंदावतात जे संकेत देतात की त्या भागात द्रव स्वरूपातील पाणी असू शकते. ‘हा’ लो-वेलॉसिटी लेयर’ (मंद लाटांचा थर) अत्यंत झिरपणारे खडक असावेत जे द्रव पाण्याने भरलेले आहेत, जणू पाण्याने ओलसर झालेला स्पंज,’ असे अभ्यासाचे सहलेखक प्रा. र्ह्वोये त्कालचिक आणि चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसचे प्रा. वेईजिया सन यांनी ‘द कन्व्हर्सेशन’साठी लिहिलेल्या लेखात स्पष्ट केले. ते पुढे म्हणतात की, ‘हा थर पृथ्वीवरील भूजलसाठ्यांसारखा असू शकतो, जिथे पाणी खडकांच्या छिद्रांमध्ये शिरते आणि साठून राहते.’ संशोधकांच्या मते, हे पाणीच पूर्वीच्या मोजणीत ‘गहाळ’ मानले गेलेले पाणी असू शकते ज्याचा मागोवा आजवर लागू शकलेला नव्हता.