

बीजिंग : चीनच्या चेंगदू शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि वैद्यकीय विज्ञानाला चकित करणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने दारूच्या नशेत लावलेल्या शर्तीतून सिगारेटचा लायटर गिळला होता. हा लायटर तब्बल 30 वर्षांहून अधिक काळ त्याच्या पोटात होता.
पोटदुखी आणि सूज वाढल्याने तो रुग्णालयात दाखल झाला, तेव्हा ही बाब उघड झाली. 30 वर्षांपूर्वीची घटना डेंग नावाच्या या रुग्णाने डॉक्टरांना सांगितले की, सुमारे 1991 किंवा 1992 मध्ये तो मित्रासोबत दारू पीत असताना, त्याने शर्त पूर्ण करण्यासाठी लायटर गिळला होता. त्याला वाटले होते की, तो नैसर्गिकरीत्या बाहेर पडेल; पण तसे झाले नाही आणि 30 वर्षे कोणतीही मोठी अडचण न येता तो पोटात राहिला. गेल्या महिन्यापासून पोटात तीव्र वेदना सुरू झाल्यावर डेंग रुग्णालयात पोहोचला.
गॅस्ट्रोस्कोपीमध्ये डॉक्टरांना त्याच्या पोटात एक काळी, आयताकृती वस्तू दिसली. डॉक्टरांनी सुरुवातीला लायटर काढण्यासाठी नेहमीच्या चिमट्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला; पण लायटरची पृष्ठभाग खूप गुळगुळीत असल्याने तो पकडताच निसटत होता. अखेरीस, डॉक्टरांनी लायटरला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी कंडोम वापरण्याचा अभिनव निर्णय घेतला. केवळ 20 मिनिटांत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली. बाहेर काढलेला 7 सेंटिमीटर लांबीचा लायटर सडलेल्या पदार्थाने झाकलेला होता. डॉक्टरांनी डेंगला त्याच्या निष्काळजीपणाबद्दल गंभीरपणे ताकीद दिली. कारण, लायटरमधील ज्वलनशील वायू लीक झाल्यास किंवा पोटातील अॅसिडशी प्रतिक्रिया झाल्यास जीवघेणा धोका निर्माण होऊ शकला असता.