

वॉशिंग्टन : पृथ्वीवर जीवनाची व्याख्या नेहमीच पाण्याभोवती फिरत आली आहे. विज्ञानाच्या पुस्तकांपासून ते अंतराळ मोहिमांपर्यंत, सर्वत्र ही धारणा आहे की, जिथे पाणी असेल, तिथे जीवनाची शक्यता असेल. परंतु, आता एका नवीन अभ्यासाने या विचारांना हादरा दिला आहे. अमेरिकेतील मॅसाचुसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (चखढ) च्या वैज्ञानिकांचा दावा आहे की, परग्रहांवरील जीवनासाठी पाणी आवश्यक नाही, काही इतर गोष्टीही जीवनाला आधार देऊ शकतात. संशोधनात असे म्हटले आहे की, काही खास प्रकारचे क्षार (सॉल्ट) द्रव स्वरूपात राहून जीवनासाठी आवश्यक वातावरण तयार करू शकतात. यांना आयॉनिक लिक्विडस्, असे म्हणतात. हे सुमारे 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानातही द्रव स्वरूपात राहू शकतात आणि तापमान व दाबाच्या विस्तृत श्रेणीत स्थिर राहतात. यामध्ये प्रथिने यासारखे जीवन-संकेतक रेणू उपस्थित राहू शकतात. या शोधाचा अर्थ असा आहे की, जे ग्रह खूप गरम आहेत किंवा ज्यांचा वातावरणीय दाब पाण्याला द्रव स्वरूपात ठेवण्यासाठी खूप कमी आहे, तिथेही जीवनासाठी जागा असू शकते.
अभ्यासाच्या प्रमुख संशोधक डॉ. रचना अग्रवाल म्हणतात, ‘आपण पाण्याला जीवनासाठी आवश्यक मानतो; कारण पृथ्वीवर जीवन पाण्याशिवाय नाही; परंतु खरे तर, आपल्याला फक्त असा द्रव हवा आहे, ज्यामध्ये जीवनाच्या चयापचय प्रक्रिया चालू शकतील. जर यामध्ये आयॉनिक लिक्विडस्चाही समावेश केला, तर विश्वात राहण्यायोग्य ग्रहांची संख्या अनेक पटींनी वाढू शकते.’ आयॉनिक लिक्विडस् पृथ्वीवर नैसर्गिकरीत्या जवळपास नगण्य प्रमाणात आढळते. हे बहुतांश उद्योगांमध्ये तयार केले जाते. तसेच, एक अनोखा अपवाद आहे, दोन वेगवेगळ्या मुंग्यांच्या प्रजातींच्या विषामुळे हा द्रव नैसर्गिकरीत्या तयार होतो. वैज्ञानिकांनी आयॉनिक लिक्विडस् स्वतःहून कशा परिस्थितीत तयार होऊ शकतात, हे समजून घेण्यासाठी अनेक प्रयोग केले. त्यांनी सल्फ्युरिक अॅसिडला 30 प्रकारच्या नायट्रोजनयुक्त सेंद्रिय संयुगांसह वेगवेगळ्या तापमानात आणि दाबाखाली मिसळले. नंतर त्यांनी पाहिले की, अॅसिडचे बाष्पीभवन झाल्यावर आयॉनिक लिक्विड तयार होते का? यापूर्वीच्या संशोधनात असे आढळले होते की, काही सेंद्रिय संयुगे सल्फ्युरिक अॅसिडमध्येही स्थिर राहू शकतात. यावेळी वैज्ञानिकांनी त्यांना बेसाल्ट खडकावरही टाकले, जो अनेक ग्रहांच्या पृष्ठभागावर आढळतो.
अभ्यासाच्या सहलेखिका डॉ. सारा सीगर सांगतात, ‘आम्हाला आश्चर्य वाटले की, जवळपास प्रत्येक परिस्थितीत आयॉनिक लिक्विड तयार होतेच; मग आम्ही अॅसिड खडकावर टाकले किंवा त्याच्या छिद्रांमध्ये शोषले, तरीही एक थेंब आयॉनिक लिक्विड राहिले.’ हा द्रव 180 डिग्री सेल्सिअसपर्यंतच्या तापमानात आणि पृथ्वीच्या वातावरणीय दाबापेक्षा खूप कमी दाबावरही तयार झाला. या शोधाचा अर्थ असा आहे की, ज्या ग्रहांवर पाणी शक्य नाही, तिथेही जर सल्फ्युरिक अॅसिड आणि सेंद्रिय घटक उपस्थित असतील, तर जीवनासारखी यंत्रणा तयार होऊ शकते. सल्फ्युरिक अॅसिड अनेक ग्रहांवर ज्वालामुखीय क्रियांमुळे तयार होऊ शकते आणि सेंद्रिय ठेवी सौरमंडलात खूप सामान्य आहेत.