

लंडन : सोशल मीडियाच्या सुरुवातीच्या काळात, 2010 मध्ये ब्रिटनमधील कोव्हेंट्री शहरात राहणार्या 45 वर्षीय मेरी बेल यांचा एक व्हिडीओ जगभर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये मेरी रस्त्यावरून जाताना एका पाळीव मांजराला (लोला) कडेला असलेल्या कचर्याच्या डब्यात बंद करताना दिसल्या होत्या. या अमानुष कृत्यामुळे जगभरातून त्यांच्यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आणि त्यांना कॅट बिन लेडी म्हणून ओळखले जाऊ लागले.
या घटनेला आता 16 वर्षे पूर्ण झाली आहेत, तरीही मेरी बेल या धक्क्यातून आणि अपमानास्पद भावनेतून बाहेर पडू शकलेल्या नाहीत. सध्या त्या अत्यंत एकाकी आणि अज्ञात आयुष्य जगत आहेत. त्या घटनेनंतर आलेल्या प्रचंड दबावामुळे आणि जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे मेरी यांना त्यांची 27 वर्षांची बँकेतील प्रतिष्ठित नोकरी सोडावी लागली. त्यानंतर त्या कधीही स्वतःची चांगली कारकीर्द उभी करू शकल्या नाहीत. प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांच्यावर खटला चालवण्यात आला होता. न्यायालयाने त्यांना 250 पाउंडचा दंड ठोठावला आणि 5 वर्षे प्राणी पाळण्यावर बंदी घातली होती.
मेरी यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले होते की, ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा मेरी यांचे वडील मृत्यूच्या दारात होते (काही दिवसांतच त्यांचे निधन झाले). मानसिक तणावामुळे त्यांच्याकडून हे कृत्य घडले असावे. मांजराचे काय झाले? ज्या लोला नावाच्या मांजराला त्यांनी डब्यात टाकले होते, त्याला 15 तासांनंतर मालकांनी सुखरूप बाहेर काढले. दिलासादायक बाब म्हणजे, या घटनेचा लोलावर कोणताही वाईट परिणाम झाला नाही. तिने एक मोठे आणि आनंदी आयुष्य जगले. सुमारे 5 वर्षांपूर्वी (2021 मध्ये) वयोमानानुसार तिचे निधन झाले. मांजराच्या मालकांनीही आता मेरी यांना माफ केले आहे; परंतु मेरी बेल आजही स्वतःला या अपमानासाठी माफ करू शकलेल्या नाहीत आणि आजही त्या जगापासून दूर एकाकी जीवन कंठत आहेत.