Interstellar comet life elements | ‘अ‍ॅटलास’ या आंतरतारकीय धूमकेतूवर जीवनासाठी आवश्यक घटक

Interstellar comet life elements |
Interstellar comet life elements | ‘अ‍ॅटलास’ या आंतरतारकीय धूमकेतूवर जीवनासाठी आवश्यक घटक
Published on
Updated on

वॉशिंग्टन : ‘नासा’च्या ‘स्फेअर-एक्स’ या अंतराळ दुर्बिणीने पाठवलेल्या नवीन आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी पृथ्वीच्या जवळून गेलेल्या ‘3आय/अ‍ॅटलास’ या आंतरतारकीय धूमकेतूने अवकाशात जीवसृष्टीसाठी आवश्यक असणार्‍या मूलभूत घटकांचे उत्सर्जन केल्याचे समोर आले आहे.

डिसेंबरमध्ये जेव्हा हा दुर्मीळ पाहुणा सूर्याला प्रदक्षिणा घालून पृथ्वीच्या सर्वात जवळून जात होता, तेव्हा स्फेअर-एक्सने त्याच्या हालचाली टिपल्या. हा धूमकेतू आता आपल्या सूर्यमालेतून बाहेर जाण्याच्या दीर्घ प्रवासाला निघाला आहे. या धूमकेतूच्या उत्सर्जनामध्ये मिथेनॉल, सायनाईड आणि मिथेन यांसारख्या सेंद्रिय रेणूंचा समावेश आहे. ‘नासा’ने स्पष्ट केले आहे की, हे रेणू पृथ्वीवरील जैविक प्रक्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचे असले, तरी ते अजैविक प्रक्रियेतूनही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ‘सेंद्रिय’ म्हणजे ‘परग्रही’ असा अर्थ काढणे घाईचे ठरेल. 2025 मध्ये शोध लागलेला ‘3आय/अ‍ॅटलास’ हा आतापर्यंतचा तिसरा आंतरतारकीय धूमकेतू असून, तो सर्वात जुना असावा असा अंदाज आहे. याच्या उत्पत्तीवरून अनेक तर्कवितर्क लावले गेले होते, अगदी तो परग्रहावरील एखादे अंतराळयान असावे, अशीही चर्चा झाली.

मात्र, खगोलशास्त्रज्ञांच्या मते हा दुसर्‍या ताराप्रणालीतून आलेला एक नैसर्गिक धूमकेतूच आहे आणि नवीन संशोधनानेही याला दुजोरा दिला आहे. धूमकेतू जेव्हा तार्‍याच्या जवळ येतात, तेव्हा उष्णतेमुळे त्यांच्या पृष्ठभागावरील बर्फाचे रूपांतर थेट वायूमध्ये होते. या प्रक्रियेमुळे धूमकेतूभोवती वायूचे ढग आणि लांबलचक शेपटी तयार होते. या वायूंच्या अभ्यासातून धूमकेतू कशापासून बनला आहे, हे शास्त्रज्ञांना समजते. जॉन्स हॉपकिन्स अप्लाईड फिजिक्स लॅबोरेटरीचे खगोलशास्त्रज्ञ कॅरी लिसे यांच्या म्हणण्यानुसार, ‘डिसेंबर 2025 मध्ये सूर्याच्या जवळून जाताना या धूमकेतूची चमक लक्षणीयरीत्या वाढली होती. तो अंतराळात कार्बनयुक्त पदार्थांचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन करत होता, जे आतापर्यंत त्याच्या पृष्ठभागाखाली बर्फात गोठलेले होते.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news