

सॅन अँटोनियो : एखादे पुस्तक ग्रंथालयातून घेतल्यानंतर ते परत करण्यासाठी 82 वर्षांचा विलंब होऊ शकतो का? हे अविश्वसनीय वाटत असले, तरी अशी घटना घडली आहे. या पुस्तकासोबत आलेल्या एका हृदयस्पर्शी चिठ्ठीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिकेतील सॅन अँटोनियो सार्वजनिक ग्रंथालयात एक अशी घटना घडली आहे, जी पुस्तकांवरील प्रेम आणि मानवी प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण आहे. तब्बल 82 वर्षांपूर्वी ग्रंथालयातून घेतलेले एक पुस्तक नुकतेच परत आले आहे. विशेष म्हणजे, या पुस्तकासोबत एक लहानशी चिठ्ठी होती, ज्यात लिहिले होते, आजी आता याचा दंड भरू शकणार नाही.
‘युअर चाईल्ड, हिज फॅमिली, अँड फ्रेंडस्’ असे या पुस्तकाचे नाव असून, ते विवाह आणि कुटुंब समुपदेशक फ्रान्सिस ब्रूस स्ट्रेन यांनी लिहिले आहे. हे पुस्तक जुलै 1943 मध्ये ग्रंथालयातून घेण्यात आले होते आणि तब्बल 82 वर्षांनंतर, गेल्या जून महिन्यात ओरेगॉनमध्ये राहणार्या एका व्यक्तीने ते परत केले. ग्रंथालयाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पत्रात पुस्तक परत करणार्या व्यक्तीने लिहिले आहे, माझ्या वडिलांच्या निधनानंतर, त्यांनी मागे ठेवलेल्या पुस्तकांचे काही बॉक्स मला मिळाले. त्यात हे पुस्तक सापडले.
या पत्रावर ‘पी.ए.ए.जी.’ अशी अद्याक्षरे आहेत. हे पुस्तक पालकांसाठी एक मार्गदर्शक होते, ज्यात मुलांना त्यांचे वैयक्तिक संबंध कसे हाताळावेत, याबद्दल माहिती दिली होती. जेव्हा हे पुस्तक ग्रंथालयातून घेतले गेले, तेव्हा ते परत करणार्या व्यक्तीच्या वडिलांचे वय अवघे 11 वर्षे होते. पुस्तक परत पाठविणार्या व्यक्तीने पत्रात पुढे लिहिले आहे की, हे पुस्तक माझ्या आजीने, मारिया डेल सोकोरो अल्ड्रेट फ्लोरेस (कोर्टेझ) यांनी घेतले असावे. त्या वर्षी (1943) त्या मेक्सिको सिटीमधील अमेरिकन दूतावासात काम करण्यासाठी स्थलांतरित झाल्या होत्या. त्यांनी हे पुस्तक आपल्यासोबत नेले असावे आणि जवळजवळ 82 वर्षांनंतर ते माझ्या ताब्यात आले.
पुस्तक परत करणार्या व्यक्तीने आपल्या चिठ्ठीत विनोदाने लिहिले की, आशा आहे की यावर कोणताही विलंब शुल्क नसेल, कारण आजी आता ते भरू शकणार नाही. पुस्तकाच्या आतील मुखपृष्ठावर विलंब शुल्क प्रतिदिन तीन सेंटस् असा शिक्का होता.आजच्या महागाईचा विचार न करता, हा दंड जवळपास 900 (सुमारे 75,000 रुपये) झाला असता. सुदैवाने, सॅन अँटोनियो ग्रंथालयाने 2021 मध्येच विलंब शुल्क घेणे बंद केले आहे, त्यामुळे या पुस्तकावर कोणताही दंड आकारण्यात आला नाही.
82 वर्षे जुने असूनही हे पुस्तक अतिशय उत्तम स्थितीत आहे. 82 वर्षांचा विलंब खूप मोठा वाटत असला, तरी हा जागतिक विक्रम नाही. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, सर्वात जास्त विलंबाने परत केलेले पुस्तक 288 वर्षांनंतर केंब्रिज विद्यापीठाच्या ग्रंथालयात जमा झाले होते. ते 1668 मध्ये घेतले होते आणि 1956 मध्ये परत आले होते. विशेष म्हणजे, त्यावरही कोणताही दंड आकारण्यात आला नव्हता.