पिसाचा झुकता मनोरा : स्थापत्यशास्त्रातील एक ‘अद्भुत’ चूक

Leaning Tower of Pisa
पिसाचा झुकता मनोरा : स्थापत्यशास्त्रातील एक ‘अद्भुत’ चूक
Published on
Updated on

पिसा (इटली) : जगातील सात आश्चर्यांपैकी एक आणि स्थापत्यशास्त्रातील एक अनोखा नमुना मानला जाणारा इटलीतील ‘पिसाचा झुकता मनोरा’ आजही पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनून राहिला आहे. विशेष म्हणजे, ज्या ‘चुकीमुळे’ हा मनोरा झुकला, तीच चूक आज या वास्तूची खरी ओळख बनली आहे.

या मनोर्‍याचे बांधकाम सन 1173 मध्ये सुरू झाले. मात्र, अवघ्या तीन मजल्यांचे काम पूर्ण झाल्यावर हा मनोरा एका बाजूला झुकू लागल्याचे कारागिरांच्या लक्षात आले. याचे मुख्य कारण म्हणजे ज्या जागेवर हा मनोरा उभा आहे, तिथली जमीन अतिशय मऊ, चिकनमाती आणि वाळू मिश्रित आहे. 185 फूट उंच असलेल्या या महाकाय इमारतीचा पाया केवळ 10 फूट खोल खोदला गेला होता, जो इतक्या वजनासाठी अपुरा ठरला. मनोरा झुकू लागल्यामुळे त्याचे बांधकाम मध्येच अनेकदा थांबवण्यात आले.

युद्धांमुळे आणि जमिनीच्या समस्यांमुळे हे काम पूर्ण व्हायला तब्बल 199 वर्षे लागली. 1372 मध्ये हा मनोरा पूर्णपणे तयार झाला. वरचे मजले बांधताना तो झुकलेल्या बाजूच्या विरुद्ध दिशेला झुकवण्याचा प्रयत्न केला गेला, ज्यामुळे या मनोर्‍याला किंचित ‘वक्र’ आकार प्राप्त झाला आहे. 1990 च्या दशकात हा मनोरा 5.5 अंशांपर्यंत झुकला होता, ज्यामुळे तो कोसळण्याची भीती निर्माण झाली होती. त्यानंतर 11 वर्षे हा मनोरा पर्यटकांसाठी बंद ठेवून तज्ज्ञांनी त्याखालची माती काढून तो सरळ करण्याचा प्रयत्न केला.

आता हा मनोरा सुमारे 3.99 अंशांवर स्थिरावला असून, पुढील 200 ते 300 वर्षे तो पडणार नाही, अशी ग्वाही संशोधकांनी दिली आहे. या अष्टकोनी मनोर्‍याचे वजन सुमारे 14,500 टन आहे. मनोर्‍याच्या शिरोभागी जाण्यासाठी सुमारे 294 ते 296 पायर्‍या आहेत. प्रसिद्ध शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलीली यांनी गुरुत्वाकर्षणाचे नियम सिद्ध करण्यासाठी याच मनोर्‍यावरून दोन वेगवेगळ्या वजनाचे गोळे खाली टाकून प्रयोग केला होता, असे मानले जाते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news