

बर्लिन : तुम्ही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल किंवा ट्रेनला पूल आणि उड्डाणपुलावरून जाताना पाहिले असेल; पण तुम्ही कधी समुद्रात चालणारी ट्रेन पाहिली आहे का? ही ट्रेन पाहणार्यांना, अगदी विज्ञान शिकणार्यांनाही विचार करण्यास लावते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ जर्मनी ते डेन्मार्क दरम्यान धावणार्या ‘बर्ड फ्लाईट लाईन’ या ट्रेनचा आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, ही संपूर्ण ट्रेन एका मोठ्या फेरीवर (जहाज) चढून पाण्यावरून जात आहे. ही सेवा जगातील शेवटची प्रवासी ट्रेन फेरी सेवा आहे, जी जर्मनीमधून डेन्मार्कपर्यंत 19 किलोमीटरचा बाल्टिक समुद्र पार करते. व्हिडीओमध्ये दिसते की, ट्रेन प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडून थेट एका विशाल फेरीच्या आत प्रवेश करते. त्यानंतर फेरीचे इंजिन सुरू होते आणि ट्रेन समुद्रातून पुढे जाते. ही स्कॅन्डलाईन्स कंपनीची फेरी आहे, जी दर अर्ध्या तासाने उपलब्ध असते. या फेरीवर ट्रेनसह कार आणि ट्रक देखील लोड केले जातात.
जर्मनी ते डेन्मार्कपर्यंतचा 19 किलोमीटरचा हा प्रवास अवघ्या 45 मिनिटांत पूर्ण होतो; पण या प्रवासाचा अनुभव आयुष्यभर लक्षात राहतो. या प्रवासादरम्यान प्रवासी ट्रेनमधून उतरून फेरीवर असलेल्या रेस्तराँमध्ये जेवण करू शकतात. येथे खरेदी करण्याची सोय देखील आहे. डेकवर उभे राहून प्रवासी समुद्राच्या लाटांसोबत सेल्फी काढतात आणि डॉल्फिन पाहण्याचा आनंद घेतात. व्हिडीओ पाहताना असे वाटते की, ट्रेन पाण्यावर उडून जात आहे! ही वोगेलफ्लुगलिनी म्हणजेच ‘बर्ड फ्लाईट लाईन’ सेवा 1963 पासून कार्यरत आहे. ट्रेनचा हा अप्रतिम व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.