

रिओ डी जानेरिओ : ॲमेझॉनच्या दाट पर्जन्यवनाखाली दडलेले अवशेष शोधण्यासाठी संशोधकांनी आधुनिक लेसर स्कॅनिंग तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी दोन हजार वर्षांपेक्षा अधिक जुन्या एका गुंतागुंतीच्या आणि रहस्यमय समाजाने निर्माण केलेल्या शेकडो प्राचीन मातीच्या वास्तूंचा (अर्थवर्क्स), आकृत्यांचा शोध लावला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासातून ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
ब्राझीलमध्ये सुमारे २,५०० वर्षांपूर्वी ‘अॅक्विरी’ नावाची ही प्राचीन संस्कृती उदयाला आली होती. या भागात सापडलेल्या प्रचंड संख्येतील जिओग्लिफ्स (जमिनीवरील भव्य आकृत्या) पाहता या संस्कृतीचा ऱ्हास होण्यापूर्वी तिची लोकसंख्या सुमारे ३० लाख असावी, असा अंदाज संशोधकांनी या अभ्यासात वर्तवला आहे. हेलसिंकी विद्यापीठातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ मार्टी पार्सिनेन यांनी सांगितले की, अॅक्विरी संस्कृतीतील विविध समुदाय आणि समाजांचे वैचारिक मूळ एकच होते. त्यांनी खोल खंदक आणि उंच बाह्य भिंतींचा वापर करून विविध भव्य भूमितीय आकारांचे धार्मिक व सांस्कृतिक केंद्रे उभारली होती.
याच रचनांना आज ‘अमेझॉनियन जिओग्लिफ्स’ म्हणून ओळखले जाते. बुधवारी ‘नेचर’ या जागतिक मासिकात प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात पार्सिनेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे ४,५०० चौरस किलोमीटर (१,७४० चौरस मैल) ॲमेझॉन पर्जन्यवनाच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष मांडले आहेत. या सर्वेक्षणात ३९६ नवीन जिओग्लिफ्स आढळून आले असून, यामुळे अॅक्विरी संस्कृतीचा भौगोलिक विस्तार किती मोठा होता, याचा अंदाज लावणे शक्य झाले आहे.
शोधकर्ते पार्सिनेन हे गेल्या दोन दशकांपासून अधिक काळापासून ब्राझीलच्या ‘आक’ राज्यातील या भूमितीय अर्थवर्क्सचा शोध घेत आहेत. २०२१ च्या एका अभ्यासात त्यांनी या बहुसंस्कृतीक प्राचीन संस्कृतीला ‘अॅक्विरी’ हे अधिकृत नाव दिले. हे नाव पेरू आणि बोलिव्हियातून वाहणाऱ्या तसेच ब्राझीलमधील आक्रे आणि अॅमेझोनास राज्यांमधून जाणाऱ्या ‘आक्रे’ नदीवरून ठेवण्यात आले आहे. स्थानिक ‘अरावाकन’ आदिवासींच्या भाषेत अॅक्विरीचा अर्थ ‘मगरींची नदी’ असा होतो.