

न्यूयॉर्क : अमेरिकेत मिसिसिपीतील एका नदीकाठावरून सापडलेले एका महाकाय ‘सी ड्रॅगन’ म्हणजेच मोसासॉरच्या मणक्याचे हाड हे राज्यात आजवर सापडलेल्या सर्वात मोठ्या मोसासॉरचे असू शकते, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. या सागरी जीवाच्या मणक्याचे फक्त एकच हाड (व्हर्टिब्रा) सापडले आहे, त्यामुळे त्याची संपूर्ण लांबी निश्चित सांगता येत नाही; मात्र तज्ज्ञांच्या मते, हा मोसासॉर किमान 30 फूट (9 मीटर) लांब असावा.
मोसासॉर, ज्यांना सी ड्रॅगन असेही म्हणतात, हे खंडावर डायनासोर राज्य करत असताना, क्रिटेशियस काळाच्या (145 ते 66 दशलक्ष वर्षांपूर्वी) अखेरीस समुद्रात वर्चस्व राखणारे सागरी सरडे होते. नव्याने सापडलेले जीवाश्म Mosasaurus hoffmanni या जातीचे असल्याचे मानले जाते, जी मोसासॉर प्रजातींपैकी सर्वात मोठी समजली जाते.
मिसिसिपी डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायर्नमेंटल क्वालिटीचे भूवैज्ञानिक जेम्स स्टार्न्स यांनी 15 एप्रिल रोजी स्टार्कव्हिलच्या दक्षिणेकडील एका प्रवाहात ही हाडं बाहेर आलेली पाहिली. त्यानंतर त्यांचे सहकारी जोनाथन लिअर्ड यांनी ते काळजीपूर्वक जमिनीतून काढले. “मला लगेचच समजले की हे काय आहे, पण त्याचा आकार पाहून मी थक्क झालो,” असे स्टार्न्स यांनी सांगितले. मोसासॉर ही अत्यंत विविधतापूर्ण सागरी प्रजाती होती. त्यांच्या काही जातींच्या लांबीचा अजूनही अभ्यास सुरू आहे, परंतु सर्वात मोठ्या प्रजाती सुमारे 50 फूट (15 मीटर) लांब असल्याचे मानले जाते.
एका 2014 च्या अभ्यासानुसार, M. hoffmanni जातीच्या एका नमुन्याचा कवटीचा आकार पाहून त्याची लांबी 56 फूट (17 मीटर) असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या नव्या जीवाश्मातील मणक्याचे हाड 7 इंचांपेक्षा अधिक (18 सेंटीमीटर) रुंद आहे. स्टार्न्स आणि त्यांच्या सहकार्यांनी मिसिसिपी म्युझियम ऑफ नॅचरल सायन्समध्ये असलेल्या मोसासॉरच्या जबड्यांशी, कवटीच्या तुकड्यांशी आणि एका दाताशी त्याची तुलना केली. त्यांनी नमूद केले की संग्रहालयातील जबड्याचा आणि कवटीचा नमुना तुलनेने लहान प्राण्याचा आहे, पण दाताची तुलना केली असता हा नवीन नमुना त्या मोठ्या जीवाशी सुसंगत वाटतो.