

वॉशिंग्टन : कल्पना करा की, तुम्ही एका मोकळ्या मैदानात उभे आहात आणि अचानक तुमच्या डोक्यावरून विमानासारखी एक प्रचंड सावली जाते. वर पाहिल्यावर तुम्हाला एखादे छोटे विमान नव्हे, तर चक्क एक पक्षी दिसतो! ही कोणतीही कल्पना नसून लाखो वर्षांपूर्वीची वस्तुस्थिती आहे. शास्त्रज्ञांनी अशाच एका महाकाय पक्ष्याचा शोध लावला आहे, ज्याचे नाव आहे ‘अर्जेंटाविस’. निसर्गाने उड्डाणाच्या शक्तीचा वापर कोणत्या टोकापर्यंत केला होता, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
या पक्ष्याचे पूर्ण नाव ‘अर्जेंटाविस मॅग्निफिसन्स’ (ईसशपींर्रींळी चरसपळषळलशपी) असे आहे. संशोधनानुसार, हा पक्षी सुमारे 70 लाख वर्षांपूर्वी सध्याच्या अर्जेंटिना परिसरात आढळत असे. या पक्ष्याच्या पंखांचा विस्तार तब्बल 23 फूट इतका होता, जो आजच्या कोणत्याही पक्ष्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. सुमारे 70 किलो वजनाचा हा पक्षी जेव्हा जमिनीवर उभा राहायचा, तेव्हा त्याची उंची 6.5 फूट असायची. अर्जेंटाविसचे वजन खूप जास्त असल्यामुळे तो लहान पक्ष्यांप्रमाणे वारंवार पंख फडफडू शकत नव्हता.
उडण्यासाठी तो ‘थर्मल सोरिंग’ तंत्राचा वापर करायचा. म्हणजे, जमिनीवरून वर येणार्या गरम हवेच्या प्रवाहावर आपले विशाल पंख पसरवून तो स्वार व्हायचा. त्याच्या पंखांचे एकूण क्षेत्रफळ 91 चौरस फूट होते, ज्यामुळे त्याला हवेत तरंगणे सोपे जात असे. या पक्ष्यासाठी सर्वात कठीण काम म्हणजे जमिनीवरून हवेत झेप घेणे आणि पुन्हा खाली उतरणे. शास्त्रज्ञांच्या मते, उड्डाण करण्यासाठी याला ताशी किमान 40 किमी वेगाची गरज भासत असे. हवेत झेप घेण्यासाठी हा पक्षी वार्याच्या दिशेने वेगाने धावायचा किंवा एखाद्या उतारावरून धावत जाऊन उड्डाण करायचा, अगदी आजच्या ग्लायडर किंवा विमानाप्रमाणे. हा आतापर्यंतचा शोधलेला सर्वात मोठा उडणारा शिकारी पक्षी मानला जात आहे. त्याच्या हाडांच्या अवशेषांवरून शास्त्रज्ञांना त्याच्या वेगाचा आणि जीवनशैलीचा उलगडा झाला आहे.