

जीनिव्हा : जगातील सर्वात मोठ्या अणुभेदकाला (Atom Smasher) म्हणजेच लार्ज हॅड्रॉन कोलायडर (LHC) ला लवकरच एक महत्त्वपूर्ण अपग्रेड मिळण्याची शक्यता आहे. स्वित्झर्लंड आणि फ्रान्सच्या सीमेवरील ‘सर्न’ या प्रयोगशाळेत लार्ज हॅड्रॉन कोलायडरची स्थापना दशकभरापूर्वी दोन मुख्य उद्दिष्टांसाठी करण्यात आली होती. पहिले उद्दिष्ट होते, हिग्ज बोसॉन या मूलकणाचे अस्तित्व सिद्ध करणे, जे 1960 च्या दशकात भाकीत करण्यात आले होते आणि जे स्टँडर्ड मॉडेल ऑफ पार्टिकल फिजिक्स या कणभौतिकीच्या सिद्धांताचा केंद्रबिंदू आहे. दुसरे उद्दिष्ट होते, नवीन कणांचा शोध घेणे. विशेषतः, असे कण जे स्टँडर्ड मॉडेलच्या पलीकडील भौतिकशास्त्रीय सिद्धांतांना समर्थन देऊ शकतील.
‘एलएचसी’ने हिग्ज बोसॉनचा शोध घेण्यात यश मिळवले आणि 2012 मध्ये ‘सर्न’ मधील शास्त्रज्ञांनी त्याचे अस्तित्व सिद्ध केले. मात्र, नवीन कणांचा शोध घेण्यात मात्र ‘एलएचसी’ ला फारसे यश आलेले नाही. गेल्या दशकभरात चाललेल्या शोध मोहिमांमध्ये स्टँडर्ड मॉडेलच्या पलीकडील कोणतेही नवीन कण आढळलेले नाहीत.
ही गोष्ट पूर्णतः निराशाजनक नसली, तरी अनेक पर्यायी सिद्धांत चुकीचे असल्याचे या निष्कर्षांमुळे सिद्ध झाले आहे, ज्यामुळे शास्त्रज्ञांना चुकीचे मार्ग सोडून योग्य दिशेने पुढे जाण्याची संधी मिळते. पण, नवीन मार्गदर्शन किंवा इशारा न मिळाल्यामुळे कणभौतिकीचे आधुनिक संशोधन सध्या अंधारात आहे.‘एलएचसी’ जरी अतिशय शक्तिशाली असले, तरी त्यालाही काही मर्यादा आहेत.
हे यंत्र मुख्यतः विद्युत भार असलेल्या आणि लवकर नष्ट होणार्या कणांचा शोध घेण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे; पण काही लांबकाळ टिकणारे, विद्युत-तटस्थ (न्यूट्रल) कण असे असतात, की जे ‘एलएचसी’ च्या मुख्य दोन डिटेक्टर्सच्या नजरेतून सुटून जातात. त्यामुळे असे कण दररोज तयार होत असले तरी ते अद़ृश्य राहतात. ही बाब ‘एलएचसी’ चे मूळ डिझायनर्स विसरलेले नव्हते. ‘एलएचसी’ सुरू झाल्यानंतर काहीच काळात, एक स्वतंत्र डिटेक्टर तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांचे पथक एकत्र आले.
या नवीन डिटेक्टरचे नाव आहे MATHUSLA जे 'Methuselah' या बायबलमधील दीर्घायुषी पात्रावरून प्रेरित आहे आणि त्याचा फुलफॉर्म आहे MAssive Timing Hodoscope for Ultra- Stable neutraL pArticles. 30 पेक्षा अधिक शास्त्रज्ञांच्या पथकाने तयार केलेल्या अहवालानुसार, MATHUSLA प्रकल्प आता अंतिम डिझाईन टप्प्यात पोहोचला आहे.