Red lake water : ‘इथे‌’ पाणी आहे रक्तासारखे लाल आणि काठावर प्राण्यांचे पुतळे!

सौंदर्यामागे दडलेले निसर्गाचे भयावह रहस्य
 Red lake water
Red lake water
Published on
Updated on

लंडन : निसर्ग जितका सुंदर आहे तितकाच तो कधीकधी क्रूर आणि रहस्यमयीही असू शकतो. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे टान्झानियातील ‌‘लेक नॅट्रॉन‌’. या तलावाचे पाणी रक्तासारखे लाल असून, ते इतके घातक आहे की, यात पडणाऱ्या प्राण्यांचे रूपांतर थेट पाषाणमूर्तींमध्ये होते.

सुमारे 15 लाख वर्षांपूर्वी ज्वालामुखी आणि टेक्टॉनिक हालचालींमुळे या तलावाची निर्मिती झाली. या तलावाच्या जवळ ‌‘ओल डोईन्यो लेंगाई‌’ नावाचा ज्वालामुखी आहे, ज्याला स्थानिक मासाई जमात ‌‘देवाचा डोंगर‌’ मानते. या ज्वालामुखीतून निघणाऱ्या खनिजांमुळेच या तलावाचे पाणी अत्यंत विषारी आणि घातक बनले आहे. या तलावाचा अनोखा लाल, गुलाबी आणि नारंगी रंग यामध्ये असलेल्या खास सूक्ष्म जीवांमुळे आहे. ‌‘हॅलोआर्किया‌’ आणि ‌‘सायनोबॅक्टेरिया‌’सारखे सूक्ष्म जीव या अतिशय खाऱ्या आणि अल्कधर्मी पाण्यात वाढतात. त्यांच्यामुळेच हा तलाव उंचावरून पाहिल्यास रक्तासारखा लाल चमकताना दिसतो.

लेक नॅट्रॉनच्या पाण्याचा पीएच स्तर 10.5 च्या आसपास आहे, जो अमोनिया इतकाच तीव मानला जातो. हे पाणी डोळे जाळू शकते, त्वचेला गंभीर इजा पोहोचवते आणि शरीरातील ओलावा वेगाने शोषून घेते. या पाण्यात ‌‘सोडियम कार्बोनेट‌’चे प्रमाण प्रचंड आहे. प्राचीन काळी इजिप्तमध्ये मृतदेह टिकवण्यासाठी (ममी बनवण्यासाठी) ज्या घटकांचा वापर केला जायचा, तसेच घटक या पाण्यात आहेत. त्यामुळे येथे मरण पावलेले प्राणी सडण्याऐवजी दगडासारखे कडक होतात आणि त्यांच्या मूर्ती तयार होतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इतका विषारी असूनही हा तलाव पूर्णपणे निर्जन नाही. हे ठिकाण ‌‘लेसर फ्लेमिंगो‌’ पक्षांचे वीणीचे मुख्य केंद्र आहे. तलावाचे विषारी पाणी इतर शिकारी प्राण्यांना दूर ठेवते, त्यामुळे फ्लेमिंगो पक्षी येथे सुरक्षितपणे आपली पिल्ले वाढवू शकतात. निसर्गाचे हे एक अजब चक्र आहे, जिथे इतरांसाठी जे मरण आहे, तेच या पक्ष्यांसाठी संरक्षण बनले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news