Green Boots | एव्हरेस्टवर ३० वर्षांपासून गोठलेला लडाखचा वीरपुत्र मायदेशी परतणार!

Green Boots |
Green Boots | एव्हरेस्टवर ३० वर्षांपासून गोठलेला लडाखचा वीरपुत्र मायदेशी परतणार!
Published on
Updated on

नवी दिल्ली : जगातील सर्वात उंच शिखर एव्‍हरेस्‍टवर गेली ३० वर्षे एक मृतदेह गिर्यारोहकांसाठी एक मार्गदर्शक खूण (मार्कर) बनून बर्फात गोठलेला आहे. ‘ग्रीन बूटस्‌’ म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या या दुर्दैवी गिर्यारोहकाला अखेर मायदेशी आणण्यासाठी भारताच्या ‘इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस’ (आयटीबीपी) दलाने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे.

१९९६ ची ती दुर्दैवी मोहीम

१० मे १९९६ रोजी आयटीबीपीच्या तुकडीने तिबेटच्या (चीन) बाजूने एव्हरेस्टवर चढाई केली होती. या मोहिमेत लडाखचे दोर्जे मोरूप (वय ४८), त्सेवांग समनला आणि त्सेवांग पालजोर हे तिघेही शिखरावर पोहोचले. परंतु, उतरताना आलेल्या भीषण हिमवादळात तिघांचाही मृत्यू झाला. दीर्घकाळ हा मृतदेह त्सेवांग पालजोर यांचा असावा असा समज होता. मात्र, ताज्या पुराव्यांनुसार आणि गिर्यारोहकांच्या नोंदींनुसार हा मृतदेह लान्स नाईक दोर्जे मोरूप यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

८,५०० मीटर उंचीवरून मृतदेह आणण्याचे आव्हान

एव्हरेस्टच्या ‘डेथ झोन’मध्ये म्हणजे ८,५०० मीटर उंचीवर, उणे ४० अंश सेल्सिअस तापमान आणि ऑक्सिजनच्या अभावात ही मोहीम राबवणे अत्यंत धोकेदायक आहे. चीनच्या बाजूने कठीण आणि उभा खडक असल्याने हेलिकॉप्टरचा वापर अशक्य आहे. त्यामुळे १० ते १२ कुशल शेर्पा आणि गिर्यारोहकांच्या मदतीने हा मृतदेह खाली आणावा लागणार आहे.

कुटुंबाची ३० वर्षांची प्रतीक्षा

दोर्जे मोरूप यांच्या पत्नी कुंचोक यांगस्किट आणि मुलगा पुंचोक दोरजाई यांनी गेली ३० वर्षे आपल्या वीराला निरोप देण्यासाठी हृदय पिळवटून टाकणारी प्रतीक्षा केली आहे. ‘‘मी त्यांचा मृतदेह पाहिला नव्हता. त्यामुळे ते गेल्याचे माझे मन स्वीकारतच नव्हते,’’ अशा शब्दांत त्यांच्या पत्नीने भावना व्यक्त केल्या. सप्टेंबर किंवा ऑक्टोबर २०२६ पर्यंत आयटीबीपी ही मोहीम पूर्ण करून मृतदेह भारतात आणणार आहे. डीएनए चाचणीद्वारे अधिकृत ओळख पटल्यानंतर लेह येथील ‘शहीद पार्क’जवळ त्यांच्यावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या आठवणी आणि त्या ऐतिहासिक ‘ग्रीन बूटस्‌’ला कुटुंब आपल्या घरी सन्मानाने जतन करून ठेवणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news