

पॅरिस : नवीन संशोधनानुसार, कृत्रिम अवयव वापरणार्या व्यक्तींना कालांतराने तो अवयव आपल्या शरीराचाच भाग आहे, असा अनुभव येऊ शकतो. एका अभ्यासात, वैज्ञानिकांनी दाखवले की, प्रयोगशाळेतील उंदीरदेखील अशाच प्रकारे कृत्रिम अवयवांना ‘आपलेपण’ म्हणून स्वीकारू शकतात. भविष्यात मानवासाठी अधिक चांगले कृत्रिम अवयव बनवण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरू शकेल, असे संशोधकांनी म्हटले आहे.
पॅरिस-सॅक्ले विद्यापीठातील सेन्सरीमोटर इंटिग्रेशन आणि प्लास्टिसिटीचे अभ्यासक लुक एस्टेबनेझ म्हणाले, ‘या संशोधनाद्वारे, आम्ही उंदरांमध्ये न्यूरल इंजिनिअरिंगसाठी एक टूलकिट आणत आहोत, ज्यामुळे प्रोस्थेसिस (कृत्रिम अवयव) नियंत्रित करण्याचे नवीन मार्ग शोधले जाऊ शकतात. ‘आपल्या सर्वांच्या मनात आपल्या शरीराचा एक नकाशा असतो, जो आपल्याला आपल्या हालचाली, स्पर्श आणि पर्यावरणाशी होणार्या प्रतिक्रियांवर लक्ष ठेवण्यास मदत करतो. जेव्हा एखादी व्यक्ती एखादा अवयव गमावते आणि कृत्रिम अवयव वापरण्यास सुरुवात करते, तेव्हा तो अवयव त्यांच्या मानसिक नकाशात समाविष्ट होतो आणि ते त्याला आपल्या शरीराचा भाग मानतात. या प्रक्रियेला ‘प्रोस्थेटिक एम्बॉडीमेंट’ म्हणतात. मात्र, अनेक लोकांना कृत्रिम अवयवांचा स्वीकार करताना अडचणी येतात.
स्किझोफ्रेनिया आणि गंभीर डिप्रेशनसारख्या काही मानसिक विकारांमध्ये लोकांच्या मनातील शरीराचा नकाशा अस्पष्ट होतो आणि त्यांना त्यांच्या शरीराची जाणीव कमी होते, ज्यामुळे ते स्वतःची काळजी घेणे टाळतात आणि गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढते. झङजड बायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन अभ्यासात, पॅरिस-सॅक्ले विद्यापीठातील संशोधकांनी प्रयोगशाळेतील उंदरांचा वापर करून अवयवांच्या एम्बॉडीमेंटचा अभ्यास करण्यासाठी एक नवीन मॉडेल विकसित केले आहे. हे मॉडेल संशोधकांना एम्बॉडीमेंट मागील न्यूरोसायन्सचा अधिक बारकाईने अभ्यास करण्यास आणि ज्यांनी आपले अवयव गमावले आहेत, त्यांच्यासाठी वर्धित कृत्रिम अवयव तयार करण्यास मदत करू शकते.
बहुतेक प्रोस्थेटिक एम्बॉडीमेंटच्या अभ्यासांमध्ये मानवी विषयांचा वापर केला जातो आणि प्रश्नावली आणि ब्रेन स्कॅनसारख्या मूल्यांकनांचा वापर केला जातो. मात्र, या द़ृष्टिकोनमुळे एम्बॉडीमेंट दरम्यान मेंदूमध्ये होणारे सूक्ष्म बदल अभ्यासणे अधिक कठीण होते. केंब्रिज विद्यापीठातील संज्ञानात्मक न्यूरोसायन्सचे प्राध्यापक तामार माकिन, जे या अभ्यासात सहभागी नव्हते, ते म्हणाले, ‘एम्बॉडीमेंट ही एक बहुआयामी घटना आहे, ज्यात चेतासंस्था, वर्तणुकीशी संबंधित परिमाण समाविष्ट आहेत. यापैकी, व्यक्तिनिष्ठ शरीर मालकीची भावना सर्वात महत्त्वाची आहे आणि गैर-मौखिक प्राण्यांमध्ये (जसे की उंदीर) ती मिळवणे खूप कठीण आहे.’