

वॉशिंग्टन : प्रयोगशाळेत मानवी मेंदू विकसित करण्याच्या दिशेने वैज्ञानिक प्रगती करत आहेत. त्याद़ृष्टीने प्रयोगशाळेत मेंदूच्या सूक्ष्म ऊती विकसित करण्यात आल्या आहेत. तथापि, या प्रयोगाच्या नैतिकतेबाबत वादविवादही सुरू झाले आहेत.
हा वादविवाद ‘ब्रेन ऑर्गेनॉईडस्’ नावाच्या छोट्या मेंदूच्या ऊतींबद्दल आहे. या ऊतींना कधी कधी ‘ब्रेन इन बॉक्सेस’ समजले जाते; पण प्रत्यक्षात त्या खूप साध्या आहेत. त्या स्टेम पेशींपासून (मूळपेशी) तयार होतात आणि खर्या मानवी मेंदूप्रमाणे कार्य करू शकत नाहीत. त्यामुळे वैज्ञानिक अजूनपर्यंत असे मानतात की, त्यांना जाणीव नसते. याच कारणामुळे त्यांच्या संशोधनावर कडक नियम नाहीत. परंतु, काही वैज्ञानिकांचे मत यापेक्षा वेगळे आहे.
चीनच्या झेजियांग विद्यापीठातील जैव-नैतिकता संशोधक क्रिस्टोफर वूड यांनी सांगितले की, ‘आपल्याला भीती वाटते की, विज्ञान कथांच्या अतिशयोक्तीमुळे संशोधनावर नियंत्रण ठेवण्याचा कल खूप वाढला आहे.’ पॅटर्न्स नावाच्या जर्नलमध्ये 12 सप्टेंबर रोजी प्रकाशित झालेल्या एका लेखात वूड आणि त्यांच्या सहकार्यांनी म्हटले आहे की, लवकरच तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे असे ऑर्गेनॉईडस् तयार होऊ शकतात, ज्यांना जाणीव असेल. या लेखातील लेखकांचे म्हणणे आहे की, ऑर्गेनॉईडस्च्या वापरासंदर्भातील नियमांचा आढावा घेतला पाहिजे.
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील मज्जातंतू-वैज्ञानिक बॉयड लोमॅक्स यांच्या मते, जर ऑर्गेनॉईडला जाणीव झाली आणि तो स्वतःचे विचार व स्वारस्य अनुभवू शकला किंवा वेदना अनुभवू शकला, तर ते अनैतिक ठरेल. परंतु, जाणीव नियंत्रित करणे सोपे नाही. मेंदूचे ऑर्गेनॉईडस् तयार करण्यासाठी स्टेम पेशींचा वापर केला जातो. जेव्हा त्यांना सपाट पृष्ठभागावर (उदा. डिशमध्ये) वाढवले जाते, तेव्हा त्या एकमेकांजवळ वाढतात आणि त्यांची रचना गुंतागुंतीची नसते. परंतु, जेव्हा त्यांना घन जेलीमध्ये किंवा बायो-रिएक्टरमध्ये वाढवले जाते, तेव्हा त्या गर्भाच्या मेंदूप्रमाणे 3 D anatomical networks तयार करतात.’
काही मज्जातंतू-वैज्ञानिक अजूनही मानतात की, 3 D रचना असूनही, हे ऑर्गेनॉईडस् जाणीवेसाठी खूप सोपे आहेत. खर्या मेंदूमध्ये जाणीव तेव्हाच निर्माण होते, जेव्हा त्याचे वेगवेगळे भाग एकमेकांशी संवाद साधतात. परंतु, हे ऑर्गेनॉईडस् मेंदूच्या एकाच भागासारखे दिसतात. तसेच, प्रयोगशाळेत वाढवलेले हे छोटे मेंदू 4 मिलिमीटरपेक्षा मोठे नसतात, ज्यामुळे असे दिसते की, जाणीवेसाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे अवयव त्यांच्यामध्ये नाहीत. इटलीमधील पेगासो विद्यापीठातील नैतिक तत्त्वज्ञ आणि मज्जा-नैतिकता तज्ज्ञ अँड्रिया लवाझ्झा यांनी सांगितले की, लोक सहसा मानवामध्ये किंवा प्राण्यांमध्ये ‘जाणीव’ म्हणजे स्वतःची ओळख असणे असे मानतात; पण ‘आम्ही ऑर्गेनॉईडस्मध्ये जाणीव म्हणजे वेदना किंवा आनंद जाणवण्याची क्षमता मानतो.