

कोच्ची : भारतात जेवढ्या विविध प्रकारच्या बोलीभाषा आहेत, तेवढीच खाद्यसंस्कृतीमध्येही विविधता आहे. प्रत्येक राज्याची आपली एक वेगळी आणि खास डिश आहे. भारतातील अनेक शहरे त्यांच्या विशिष्ट चवीसाठी आणि पदार्थांसाठी देशभरात प्रसिद्ध आहेत. परंतु, जेव्हा ताजे मासे, कोळंबी आणि खेकड्यांचा विषय येतो, तेव्हा एक राज्य सर्वात आघाडीवर आहे. हे राज्य म्हणजे केरळम्. तेथील कोच्ची या शहरात अतिशय फ्रेश सीफूड मिळते, ज्याची चव चाखण्यासाठी देशभरातून खवय्ये येथे गर्दी करतात. चला तर मग जाणून घेऊया भारताची ‘सीफूड कॅपिटल’ असलेल्या या शहराबद्दल.
केरळम् राज्यातील ‘कोच्ची’ हे शहर ‘सीफूड कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते. अरबी समुद्राच्या किनार्यावर वसलेले कोच्चि हे अत्यंत सुंदर आणि प्रेक्षणीय शहर आहे. हे शहर सागरी व्यापार, बॅकवॉटर्स (खाड्या) आणि मुख्यत्वे सीफूडसाठी जगभर प्रसिद्ध आहे. या शहरात मिळणारे मासे, कोळंबी आणि खेकडे अतिशय ताजे असतात. कोच्चिमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. येथे रोज समुद्रातून ताजा मासळी साठा पकडला जातो, जो थेट स्थानिक बाजारपेठांमध्ये आणि हॉटेल्समध्ये पोहोचवला होतो. याच कारणामुळे कोच्चिमधील सीफूड अतिशय चवदार आणि फ्रेश असते.
येथे सीफूड तयार करताना खोबरे, कढीपत्ता आणि स्थानिक सुवासिक मसाल्यांचा वापर केला जातो. येथील ‘फिश करी’, ‘प्रॉन फ्राय’ आणि ‘करीमीन पोलिचथु’ हे पदार्थ प्रचंड लोकप्रिय आहेत. कोच्चीमध्ये केवळ चवदार सीफूड मिळत नाही, तर येथून मोठ्या प्रमाणात कोळंबी, खेकडे, लॉबस्टर, स्क्विड आणि शिंपले इतर देशांमध्ये निर्यात केले जातात. जागतिक सागरी बाजारपेठेत कोच्चीने भारताची एक मजबूत ओळख निर्माण केली आहे. कोच्चिची संपूर्ण अर्थव्यवस्था मुख्यत्वे मासेमारी उद्योगावर आधारित आहे. येथील हजारो लोक या व्यवसायाशी जोडलेले आहेत. मच्छीमार, स्थानिक व्यापारी, वाहतूकदार, प्रोसेसिंग फॅक्टरीमधील कामगार आणि निर्यात करणार्या कंपन्या या व्यवसायावर अवलंबून आहेत. येथे मासे पकडण्यासाठी पारंपरिक पद्धतींसोबतच आधुनिक मेकॅनाइज्ड बोटस्चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.