

भारताला सध्या ‘मधुमेहाची जागतिक राजधानी’ असेच म्हटले जाते. आपल्या देशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मधुमेह झाला असेल, तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे सेवन करताना काळजी घेण्याची गरज असते. अशा परिस्थितीत तुम्ही किवीला तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता. तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात. यामध्ये कमी ग्लायसेमिक निर्देशांक आहे आणि यामुळे इतर अन्नपदार्थांमधून ग्लुकोज शोषण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना याचा खूप फायदा होऊ शकतो. किवीचा ग्लायसेमिक इंडेक्स स्कोअर सुमारे 50 आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्याच्या सेवनामुळे रक्तातील साखर वाढण्याची समस्या भेडसावत नाही. कमी ‘जीआय’ अन्नपदार्थ रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात. किवीचे हे काही फायदे...
किवी हे व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेले फळ आहे. यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ही समस्या खूप सामान्य आहे. ज्यामुळे केवळ हृदयविकारच नाही, तर मज्जातंतूंनाही नुकसान होऊ शकते. व्हिटॅमिन सी मुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
किवीमध्ये विरघळणारे फायबर आढळते. त्यामुळे किवीच्या सेवनाने रक्तातील साखरेचे शोषण कमी होते. किवी पचनासाठी देखील फायदेशीर आहे आणि बद्धकोष्ठता आणि इतर पाचन तंत्राशी संबंधित समस्या टाळण्यास मदत करते.
फळांमध्ये कार्बोहायड्रेट मुबलक प्रमाणात आढळतात. पण, इतर फळांच्या तुलनेत किवीमध्ये कमी कर्बोदके असतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला तुमच्या रक्तातील साखरेची काळजी न करता फळांचा आस्वाद घ्यायचा असेल, तर किवीचे सेवन जरुर करावे, असे तज्ज्ञ सांगतात.
किवीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त आणि कॅलरीज कमी असल्याने मधुमेहाच्या रुग्णांना त्यांचे वजन कमी करायचे असेल किंवा ते टिकवून ठेवायचे असेल, तर किवीला आपल्या आहाराचा भाग बनवा. तुमचे वजन नियंत्रित करून ते रक्तातील साखरेची पातळी कमी करतील.