

अबू धाबी : संयुक्त अरब अमिरातीत अबू धाबी विमानतळावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर आगीसारखा पसरला आहे. या व्हिडीओमध्ये एका खासगी विमानातून आफ्रिकी-अमेरिकन व्यक्ती उतरताना दिसत आहे, ज्याच्या स्वागतासाठी अनेक महिला खाली झुकून अभिवादन करत आहेत. तो व्यक्ती पारंपरिक, कमी कपड्यांमध्ये होता, पण त्याची शान पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला. आपल्या पंधरा पत्नी आणि तीस मुलांसह हा माणूस थाटात अबू धाबी विमानतळावर उतरला आणि त्याच्याविषयी लोकांना कुतूहल निर्माण झाले! हा कोणी सामान्य व्यक्ती नसून एस्वातिनी (पूर्वीचे स्वाझीलँड) या देशाचे राजा मस्वाती तृतीय असल्याचे उघड झाले. ते आफ्रिकेतील शेवटच्या पूर्ण राजेशाहीचे राजा आहेत. त्यांच्या अबू धाबीतील आगमनाच्या जून्या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.
10 जुलै 2025 रोजी अबू धाबी येथे त्यांचे आगमन इतके भव्य होते की, त्यांच्या स्वागतासाठी विमानतळाचे तीन टर्मिनल बंद करावे लागले. त्यांच्यासोबत 15 पत्नी, 30 मुले आणि सुमारे 100 सेवक यांचा मोठा ताफा होता. राजा मस्वाती यांचा अबू धाबी दौरा आर्थिक करारांसाठी होता, असे सांगितले जात असले तरी, खरी चर्चा त्यांच्या शाही थाटाची झाली. व्हायरल व्हिडीओमध्ये राजा मस्वाती बिबट्याच्या कातडीसारख्या पारंपरिक वस्त्रांमध्ये दिसले, तर त्यांच्या पत्नी रंगीबेरंगी आफ्रिकी पोषाखात होत्या. त्यांचे 100 सेवक त्यांच्या शाही सामानाची व्यवस्था करण्यात व्यस्त होते.
जगभरातील सोशल मीडिया वापरकर्ते राजा मस्वाती यांचा हा थाट पाहून थक्क झाले आहेत. राजा मस्वाती यांचे वडील, राजा सोभूझा द्वितीय यांना 70 हून अधिक पत्नी आणि 200 हून अधिक मुले होती. स्वतः राजा मस्वाती यांना 30 पत्नी आहेत, त्यापैकी सध्या 15 त्यांच्यासोबत दौर्यावर होत्या. ते 1986 पासून सत्तेवर आहेत आणि त्यांची नेटवर्थ 1 अब्ज डॉलरपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. राजा मस्वाती दरवर्षी रीड डान्स नावाच्या परंपरेत एक नवीन वधू निवडतात, ज्यामुळे ते सतत वादात असतात. दुसरीकडे, आफ्रिकेतील या छोट्या राजेशाहीमध्ये 60 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या दारिद्य्ररेषेखाली जगत आहे, तर राजाचा शाही खर्च करोडोंमध्ये असतो. यामुळे जनता त्यांच्या शाही दिखाव्यावर सतत टीका करत असते.