

वॉशिंग्टन : अमेरिकेत वॉशिंग्टन डी. सी. मधील टाईडल बेसिन परिसरात एका कुटुंबाचा सकाळी चेरी ब्लॉसमच्या सुंदर नजार्यात फोटोशूट सुरू असताना, त्यांच्यासोबत एक अनपेक्षित घटना घडली...अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा त्यांच्या फोटोमध्ये अचानक आले!
सोमवारी सकाळी मूर कुटुंबातील आई पोर्टिया मूर आपल्या मुलांचे फोटो घेत होत्या. बेल आणि प्रेस्टन हे दोघं फुलांनी बहरलेल्या चेरी वृक्षाखाली उभे होते आणि फोटोग्राफर ब्रिआना इनल त्यांचे खास क्षण कॅमेर्यात टिपत होत्या. त्याचवेळी, पोर्टिया लहानग्या 20 महिन्यांच्या मुलाकडे लक्ष देत असताना, त्यांच्या पतींनी अचानक सांगितले, ‘ते ओबामा आहेत!’ पण पोर्टिया यांनी तिकडे फारसे लक्ष दिले नाही आणि त्या म्हणाल्या, ‘हो ठीक आहे, पण मी सध्या प्रेस्टनकडे लक्ष देत आहे.’ थोड्या वेळाने, त्यांनी परत विचारले, ‘तू काय म्हणालास?’ त्यावर त्यांनी पुन्हा सांगितले, ‘खरंच, ते ओबामा आहेत!’ हे खरंच होते की नाही, याची खात्री करण्यासाठी पोर्टिया यांनी फोटोग्राफरला फोटो स्क्रोल करून पाहायला सांगितले. आणि आश्चर्य! त्यांच्या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा निवांत फिरताना दिसले. ओबामा एक साधा बेसबॉल कॅप घालून चालत जात होते आणि अनाहूतपणे फोटोशूटचा भाग बनले होते. ब्रिआना इनल यांनी या अनोख्या क्षणाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले, ‘मी सहसा फोटोशूटमधून टुरिस्ट्स हटवते, पण या फोटोमध्ये मी कोणतेही एडिटिंग करणार नाही!’ जेव्हा पोर्टिया मूर यांना विचारण्यात आले की, ‘हा फोटो तुमच्या कुटुंबाच्या ख्रिसमस कार्डसाठी वापराल का?’ त्यावर त्या आनंदाने हसत म्हणाल्या, ‘ओह माय गॉड! नक्कीच! मी याचा विचार केला नव्हता; पण आता हा फोटो शंभर टक्के आमच्या ख्रिसमस कार्डवर असेल!’