

वॉशिंग्टन ः अमेरिकेतील डॉक्टरांनी एका रुग्णावर किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे आणि तीही हा रुग्ण पूर्णपणे शुद्धीत असताना! 24 मे रोजी शिकागोच्या नॉर्थवेस्टर्न मेडिसिन हॉस्पिटलमध्ये या जॉन निकोलस नावाच्या माणसावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
या संपूर्ण शस्त्रक्रियेवेळी जॉन पूर्णपणे शुद्धीत होता व जे घडत होते ते पाहत होता! जनरल अॅनेस्थेटिक शिवायच त्याला ही नवी किडनी देण्यात आली. दुसर्या दिवशीच हा रुग्ण घरीही गेला! अर्थात जगात अशा पद्धतीने झालेली ही पहिलीच शस्त्रक्रिया नाही. मात्र, तरीही ही काही सर्वसामान्यपणे नेहमी घडणारी घटना नाही.
28 वर्षांच्या या तरुणाला चोवीस तासांतच घरी जाऊ देण्यात आले. एरवी किडनी ट्रान्सप्लंट झालेल्या रुग्णाला अनेक दिवस रुग्णालयात राहावे लागत असते. किमान आठवडाभर तरी असे रुग्ण रुग्णालयात असतात. निकोलसवर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी डॉक्टरांनी मणक्याच्या खालील भागात अॅनेस्थेटिक दिले होते.
शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टर त्याला तणावरहीत ठेवण्यासाठी हास्यविनोदही करीत होते. ही शस्त्रक्रिया सुमारे दोन तास सुरू होती. या काळात निकोलसला कोणत्याही वेदना जाणवल्या नाहीत. शस्त्रक्रियेवेळी तर त्याने आपल्या शरीरात बसवली जाणारी नवी किडनीही कुतुहलाने पाहिली! ही किडनी त्याच्या एका मित्रानेच दान केलेली आहे.
आता हॉस्पिटलमध्ये एका पत्रकार परिषदेत डॉक्टर व निकोलसने याबाबतची माहिती दिली आहे. निकोलसला तो सोळा वर्षांचा असल्यापासूनच किडनीच्या समस्या सुरू झाल्या होत्या. त्याच्यावर किडनी प्रत्यारोपण करण्याची गरज असल्याचे निष्पन्न झाले होते. 1954 मध्ये जगातील पहिली किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती.