अभियांत्रिकीचा अद्भुत चमत्कार धोक्यात

कृत्रिम बेटांवर बांधलेले कंसाई विमानतळ खचतंय
kansai-airport-built-on-artificial-islands-is-sinking
Pudhari File Photo
Published on
Updated on

टोकिओ : जपानचे प्रसिद्ध कंसाई आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्याला एकेकाळी अभियांत्रिकीचा एक अद्भुत चमत्कार मानले जात होते, ते आता हळूहळू खचू लागले असून समुद्राच्या खोल पाण्यात जातआहे. हे धक्कादायक द़ृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होते. ओसाकाच्या खाडीमध्ये दोन कृत्रिम बेटांवर बांधलेले हे विमानतळ 1994 मध्ये सुरू झाले, तेव्हा समुद्राच्या मऊ जमिनीवर तरंगणारी एक उत्कृष्ट रचना म्हणून जगभरात ओळखले गेले. मात्र, आज अनेक वर्षांनंतर हेच विमानतळ एका गंभीर धोक्याचा सामना करत आहे. ते हळूहळू जमिनीत खचत असून समुद्राच्या दिशेने झुकत आहे. आतापर्यंत त्याचा पृष्ठभाग सुमारे 3.84 मीटर खाली गेला आहे, तर बांधकामापासून आतापर्यंत ते एकूण 13.6 मीटर खचले आहे.

2018 चे टायफून जेबी आणि उपाययोजना

2018 मध्ये आलेल्या ‘टायफून जेबी’ या चक्रीवादळाने या भागात मोठा हाकाकार माजविला होता. वादळामुळे विमानतळावर भीषण पूर आला आणि ते काही काळासाठी बंद करावे लागले. या घटनेने विमानतळाचा भौगोलिक कमकुवतपणा उघड झाला होता. तथापि, जपानच्या अभियंत्यांनी यावर उपाययोजना करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. समुद्राच्या संरक्षक भिंती मजबूत करण्यात आल्या आहेत आणि जमिनीखालील पाण्याचा दाब कमी करण्यासाठी ‘व्हर्टिकल सँड ड्रेन सिस्टीम’सारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर 150 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली आहे.

विमानतळ का खचत आहे?

कंसाई विमानतळाखालील जमीन समुद्राच्या मऊ मातीने बनलेली आहे, जी विमानतळाचे प्रचंड वजन पूर्णपणे पेलू शकत नाही. यामुळे विमानतळाची जमीन सातत्याने खाली खचत आहे. ही समस्या बांधकामाच्या सुरुवातीच्या वर्षांपासूनच दिसू लागली होती आणि पहिल्या 8 वर्षांतच जमीन सुमारे 12 मीटर खाली गेली होती. याशिवाय, वाढणारी समुद्रपातळी आणि नैसर्गिक हवामान बदल या संकटामध्ये आणखी भर घालत आहेत. समुद्राचे पाणी हळूहळू या कृत्रिम बेटाला वेढा घालत असल्यामुळे धोका वाढला आहे.

सद्य:स्थिती आणि भविष्यातील आव्हान

2024 च्या आकडेवारीनुसार, विमानतळाच्या पहिल्या बेटाचा भाग दरवर्षी सुमारे 6 सेंटीमीटर आणि दुसर्‍या बेटाचा भाग 21 सेंटीमीटरने खचत आहे. काही ठिकाणी तर जमीन 17.47 मीटरपर्यंत खाली गेली आहे, जी गंभीर चिंतेची बाब आहे. असे असूनही, हे विमानतळ आजही 91 शहरांसाठी एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. 2024 मध्ये येथून 30.6 दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला. याच वर्षी या विमानतळाला जगातील सर्वोत्तम लगेज हँडलिंगचा पुरस्कारही मिळाला आहे. जपान सरकार आणि अभियंते हे विमानतळ वाचवण्यासाठी सतत प्रयत्न करत असले, तरी खचण्याचा धोका अद्याप टळलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news