

लंडन : काकापो हा जगातील एकमेव उडता न येणारा पोपट आहे. त्याच्या पंखांची रचना आणि जड शरीर यामुळे तो उडू शकत नाही. उडता न आलं, तरी हा पोपट झाडांवर विलक्षण चपळाईने चढू शकतो. तो आपल्या मजबूत पायांचा आणि तीक्ष्ण नखांचा वापर करून सहज वर चढतो. रात्रीच्या वेळी तो झाडावर चढून अन्न शोधतो. काकापो हा न्यूझीलंडमध्ये आढळणारा अतिशय दुर्मीळ पक्षी आहे. सध्या त्याची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे तो अतिसंकटग्रस्त श्रेणीत आहे. काकापो हा जगातील सर्वात वजनदार पोपटांपैकी एक आहे. याचे वजन 2-4 किलोपर्यंत असू शकते.
हा पक्षी प्रामुख्याने रात्री सक्रिय असतो आणि दिवसा झाडांच्या पानांमध्ये किंवा जमिनीवर लपून बसतो. नर काकापो प्रजनन काळात मोठा ‘बूम’ असा खोल आवाज काढतो जो काही किलोमीटरपर्यंत ऐकू जाऊ शकतो. काकापोच्या शरीरातून फळांसारखा एक हलका, गोड वास येतो. दुर्दैवाने यामुळेच पूर्वी त्याच्यावर शिकारींचा धोका वाढला. प्राणी त्याचा वास घेऊन त्याच्यापर्यंत सहज पोहोचतात. काकापो हे पक्षी पाने, फळे, झाडांची साल, बिया खातात. त्यांना विशेषतः ‘रिमू’ झाडाचे फळ खाणे आवडते.
काकापोचे पचन तंत्र खूपच खास आहे, म्हणूनच तो काही विशिष्ट झाडांवर अवलंबून आहे. काकापोचा रंग प्रामुख्याने हिरवा, पिवळसर-हिरवा व काळ्या पट्ट्यांनी मिश्रित असतो. चेहर्यावर तपकिरी-हिरवट पिसांमुळे तो घुबडासारखा दिसतो म्हणून त्याला “घुबड पोपट” ही म्हणतात. त्याची गोल, तपकिरी-हिरवे पिसे, मोठे डोळे आणि शांत हालचाली यामुळे तो घुबडासारखा दिसतो. चेहर्याभोवती गोल रिंगसारखी पिसे असतात, ही घुबडासारखी “फेशियल डिस्क” त्याला रात्री अंधारात ऐकू येणारे आवाज अधिक स्पष्टपणे टिपायला मदत करते.