

वेलिंग्टन : जवळपास 30 वर्षांपूर्वी पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या न्यूझीलंडच्या दुर्मीळ ‘काकापो’ पक्ष्याने संवर्धनाच्या क्षेत्रात एक मोठा टप्पा गाठला आहे. चालू प्रजनन हंगामात आतापर्यंत तब्बल 105 काकापो पिलांचा जन्म झाला असून, गेल्या तीन दशकांतील ही सर्वोच्च संख्या असल्याची माहिती न्यूझीलंडच्या संरक्षण विभागाने दिली आहे.
न्यूझीलंडच्या ‘डिपार्टमेंट ऑफ कन्झर्व्हेशन’ने 3 एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, या हंगामात एकूण 256 अंडी घालण्यात आली होती, त्यापैकी 105 अंडी उबवून पिले बाहेर आली आहेत. सध्या यातील 98 पिले जिवंत असून, एका अंड्यावर अजूनही ‘इन्क्यूबेटर’मध्ये प्रक्रिया सुरू आहे. काकापो हा जगातील एकमेव असा पोपट आहे, जो उडू शकत नाही. हे जगातील सर्वात वजनदार पोपट असून, नराचे वजन साधारण 4 किलोपर्यंत असू शकते. हे पक्षी दर दोन ते चार वर्षांनी एकदाच प्रजनन करतात, ज्यामुळे त्यांची संख्या वाढवणे अत्यंत आव्हानात्मक असते.
एकेकाळी लुप्त होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या या पक्ष्यांची सध्याची एकूण संख्या साधारण 235 इतकी आहे. काकापो रिकव्हरी प्रोग्रामच्या रेंजर सारा मँकेटेलो यांनी सांगितले की, सर्वच पिलांचे जगणे कठीण असते. आतापर्यंत 7 पिलांचा मृत्यू झाला असून, 4 पिलांवर ड्युनेडिन वन्यजीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जेव्हा ही पिले 150 दिवसांची होतील (साधारण जुलैच्या मध्यापर्यंत), तेव्हा त्यांना ‘प्रौढ’ मानले जाईल आणि त्यानंतरच या हंगामातील अधिकृत संख्या निश्चित केली जाईल. सध्या सर्वात मोठे पिल्लू 50 दिवसांचे झाले आहे. 1990 च्या दशकात शिकार, अधिवास नष्ट होणे आणि नवीन भक्षकांमुळे ही प्रजाती धोक्यात आली होती. मात्र, आताच्या विक्रमी जन्मदरामुळे हा पक्षी निसर्गात पुन्हा पाय रोवेल, अशी आशा निर्माण झाली आहे.