

वॉशिंग्टन : डायनासोरच्या काळात काही उडणारे डायनासोर होते. तसेच आजच्या पक्ष्यांचे काही उत्क्रांतीच्या टप्प्यामधील पक्षीही होते. त्यांचे वेळोवेळी मिळणारे जीवाश्म त्यांच्याविषयीच्या माहितीवर प्रकाश टाकत असतात. ज्युरासिक युगात पृथ्वीवर वावरणारा व उडू न शकणारा एक प्राचीन पक्षी एखाद्या शिकारी फलंसी ‘फिजंट’ पक्ष्यासारखा होता, ज्याच्या पायांमध्ये भक्ष्याचा प्राण घेऊ शकणाऱ्या अत्यंत तीव्र व प्राणघातक नख्या होत्या, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे.
विज्ञानाच्या जगात हा शोध अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, यावरून डायनासोर आणि पक्ष्यांच्या उत्क्रांतीबद्दलचे अनेक रंजक पैलू उजेडात आले आहेत. प्राचीन काळातील हे पक्षी दिसायला जरी साधे वाटत असले, तरी त्यांच्या शिकारीच्या पद्धती आणि शारीरिक रचना अतिशय धोकादायक होती. संशोधकांच्या मते, हे पक्षी जमिनीवर वावरणारे आणि अतिशय वेगवान शिकारी असावेत. त्यांच्या पायांच्या नख्यांचा वापर ते आपले शिकार पकडण्यासाठी आणि बचावासाठी करत असत. या संशोधनामुळे जुन्या काळातील परिसंस्थेची माहिती अधिक स्पष्ट होत असून, डायनासोरच्या युगात पक्ष्यांचे पूर्वज कसे जगले यावर नवीन प्रकाश पडला आहे.