

सेंट हेलेना : दक्षिण अटलांटिक महासागरातील सेंट हेलेना या बेटावर राहणारे ‘जोनाथन’ नावाचे कासव सध्या जागतिक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. जगातील सर्वात वृद्ध भूचर प्राणी असलेल्या या कासवाचे वय सध्या १९४ वर्षे आहे. अल्ड्राब्रा प्रजातीच्या (Aldabrachelys gigantea) कासवांचे सरासरी आयुष्य सुमारे १०० वर्षे मानले जाते. परंतु, जोनाथनने या वयापेक्षा तब्बल एक शतक जास्त आयुष्य जगण्याचा टप्पा पार केला आहे. आता वैज्ञानिकांनी त्याच्या या अद्भुत आणि प्रदीर्घ आयुष्यामागील अनोखी जनुकीय आणि एपिजेनेटिक रहस्ये शोधून काढली आहेत.
वैज्ञानिक संशोधनादरम्यान जोनाथनच्या जनुकांचा आणि त्याच्या ‘डीएनए’ रेणूंवर असलेल्या रासायनिक घटकांचा, ज्यांना ‘एपिजेनेटिक मार्कर्स’ म्हणतात, सखोल अभ्यास करण्यात आला. हे मार्कर्स कोणते जनुक किती प्रमाणात कार्य करेल हे नियंत्रित करतात. विश्लेषणात असे दिसून आले की, जोनाथनच्या पेशींमधील ‘मायटोकॉन्ड्रिया’च्या कार्यक्षमतेशी संबंधित जनुके अतिशय उत्तम स्थितीत आहेत. पेशींना ऊर्जा देणाऱ्या या मायटोकॉन्ड्रियाच्या उत्तम कार्यामुळेच जोनाथनला इतके दीर्घ आयुष्य लाभले असावे, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.
माणसाचे आयुष्य वाढवण्यासाठी आणि विविध आजारांवर औषधे शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या नॅशव्हिल येथील ‘कॅलेल फाऊंडेशन’चे मुख्य वैज्ञानिक आणि या अभ्यासाचे सहलेखक स्टीफन क्लार्क यांनी सांगितले की, ‘मायटोकॉन्ड्रियाचे कार्य आणि दीर्घायुष्य यांचा थेट संबंध आधीपासूनच मानला जातो. परंतु, जोनाथनच्या अभ्यासातून या प्रक्रियेची नवीन आणि सखोल माहिती समोर आली आहे.’ क्लार्क आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे संशोधन ‘सायन्स ॲडव्हान्सेस’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध केले आहे. जवळपास एका दशकापूर्वी संशोधकांनी जोनाथनची काळजी घेणारे पशुवैद्यकीय अधिकारी जो हॉलिन्स यांच्याशी संपर्क साधून नमुने गोळा करण्याची विनंती केली होती. मात्र, संसर्गाच्या भीतीपोटी बेट प्रशासनाने जोनाथनच्या शरीरातून रक्त काढण्यास सक्त मनाई केली होती.
‘जोनाथनच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारा डॉक्टर मला व्हायचे नव्हते,’ असे क्लार्क यांनी सांगितले. त्यामुळे डॉक्टरांनी रक्ताऐवजी जोनाथनच्या गालाच्या आतील बाजूचे ‘चीक स्वॅब’ नमुने गोळा केले. हे नमुने जेव्हा अमेरिकेतील प्रयोगशाळेत पोहोचले आणि संशोधकांनी त्यांच्या जनुकांचा क्रम तपासण्यास सुरुवात केली, तेव्हा संगणक वारंवार क्रॅश होत होते. त्यानंतर वैज्ञानिकांच्या लक्षात आले की, मिळालेले ‘डीएनए’ जोनाथनच्या स्वतःच्या पेशींचे नसून त्याच्या तोंडातील जीवाणूंचे होते. क्लार्क यांनी सांगितले की, अधिक माहिती आणि नमुने गोळा करण्याच्या परवानगीसाठी त्यांना पुन्हा मागे जाऊन विनंती करावी लागली होती. त्यानंतर पशुवैद्यांनी गालाच्या आतील पेशी खरवडून (‘चीक स्क्रॅप’) नमुने पाठवले, जे आधीच्या ‘चीक स्वॅब’पेक्षा थोड्या वेगळ्या साधनाद्वारे घेतले जातात. यावेळी मात्र मिळालेला ‘डीएनए’ खरोखरच जोनाथनचाच होता.