

सॅन फ्रान्सिस्को : जगातील आघाडीची एआय कंपनी ‘ओपन एआय’मध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे कंपनी नवनवीन फीचर्स आणून तंत्रज्ञान क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करत असताना, दुसरीकडे कंपनीला शून्यातून उभे करणारे विश्वासू आणि जुने चेहरे एकापाठोपाठ एक साथ सोडत आहेत. या यादीत आता आणखी एक मोठे नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे जोआन जांग.
‘ओपन एआय’मध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळणार्या जोआन जांग यांनी साडेचार वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर कंपनीला अलविदा केले आहे. त्या कंपनीत ‘हेड ऑफ मॉडेल बिहेविअर’ म्हणून कार्यरत होत्या. जोआन अशा वेळी कंपनीत रुजू झाल्या होत्या जेव्हा ‘ओपन एआय’ ही एक लहान रिसर्च टीम होती. त्यांनी या कंपनीला जागतिक ब—ँड बनताना जवळून पाहिले आहे. जोआन जांग यांनी ‘ओपन एआय’ च्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये मोलाची भूमिका बजावली : GPT-4 आणि DALL- E : यांसारखे दिग्गज मॉडेल्स तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ‘एआय’ ची व्यक्तिमत्त्व मांडणी : ‘एआय’ मानवांशी कसे बोलेल, त्याची व्यक्तिमत्त्व शैली कशी असेल आणि तो युजर्सच्या अपेक्षांना कसा उतरेल, हे जोआन यांनीच निश्चित केले होते.
‘एआय’ आणि मानव यांच्यातील संवाद अधिक सुलभ करण्यासाठी त्यांनी ‘OpenAI Labs’ची स्थापना केली होती. आपल्या ‘फेयरवेल नोट’मध्ये जोआन यांनी ‘ओपन एआय’मधील आपला अनुभव शेअर केला. त्या म्हणाल्या, ‘मी येथे एकाच कंपनीत असूनही तीन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केल्याचा अनुभव घेतला, कारण कंपनीचा विकास अत्यंत वेगाने झाला. त्यांनी कंपनीच्या कार्यसंस्कृतीचे कौतुक करताना सांगितले की, ‘ओपन एआय’मध्ये नेहमीच चौकटीबाहेरचा विचार करणार्या नवीन प्रयोगांना प्रोत्साहन दिले जाते. जाता-जाता त्यांनी आपल्या टीमचे आभार मानले आणि मॉडेल डिझाईन क्षेत्रात जोखीम पत्करणार्या सहकार्यांची प्रशंसा केली.