

लंडन : जगात अनेक प्रकारचे विषारी जीव आढळतात. त्यापैकी काही समुद्राच्या अथांग खोलीवरही आहेत. इरुकांजी जेलीफिश (Irukandji Jellyfish) हा जीव सापापेक्षाही जास्त घातक विषारी आहे. हा जीव ऑस्ट्रेलियामधील उत्तर भागात मिळतो. हा जलचर त्याच्या विषारी दंशामुळे ओळखला जातो. त्याचा दंश जीवघेणाच असतो. त्याला जगातील सर्वात घातक दर्जा दिला गेला आहे. इरुकांजी जेलीफिशने दंश केल्यास व्यक्तीला होणार्या वेदना खूप तीव्र आणि असह्य असतात. त्या अनेक दिवस होतात. त्याला ‘इरुकांजी सिंड्रोम’ म्हणतात. यामुळे पीडित व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर खूप वाईट परिणाम होतो. तो नैराश्यात जातो आणि त्याला आत्महत्येचे विचारही येतात.
समुद्रात आढळणार्या प्राण्याचा आकार खूपच लहान आहे. तो सुमारे 1 सेंटिमीटरपर्यंत वाढू शकतो. त्याचे शरीर पारदर्शक आहे. त्यामुळे पाण्यात तो दिसू शकत नाही. जवळजवळ अद़ृश्यच असतो! व्यक्ती जेव्हा समुद्रात पोहण्यासाठी जातात, तेव्हा तो दंश मारतो. जोपर्यंत त्याला ते कळते तोपर्यंत त्याचे विष संपूर्ण शरीरात पोहोचलेले असते. जेलीफिशचे विष इतके शक्तिशाली आहे की, ते एखाद्या व्यक्तीला मारण्यासाठी पुरेसे आहे. इरुकांजी जेलीफिशच्या विषावर कोणतेही औषध नाही. त्यामुळे तो आणखी घातक ठरतो. जेलीफिश सागरी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो सागरी परिसंस्था राखण्यास मदत करतो. समुद्रातील लहान मासे आणि प्लँक्टन नियंत्रित करण्यास मदत करते. ज्यामुळे जैवविविधता राखली जाते; मात्र माणसासाठी कधी कधी तो असा धोकादायक ठरू शकतो.