1200 कोटी प्रकाशवर्ष अंतरावर ‘जेलीफिश’ आकाशगंगेचा शोध
वॉशिंग्टन : विश्वाच्या अनंत पसार्यात डोकावणार्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या शक्तिशाली नजरेतून आणखी एक आश्चर्यकारक शोध समोर आला आहे. खगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून तब्बल 1200 कोटी प्रकाशवर्ष दूर असलेल्या एका प्राचीन आणि रहस्यमयी ‘जेलीफिश’ आकाशगंगेचा शोध लावला आहे. या आकाशगंगेचे स्वरूप समुद्रातील जेलीफिशप्रमाणे असून, तिच्या एका बाजूने जेलीफिशच्या टेंटॅकल्सप्रमाणे वायू आणि तार्यांचे लांब पट्टे बाहेर पडताना दिसत आहेत, ज्यामुळे खगोलविश्वात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
वॉटरलू विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ इयान रॉबर्टस् आणि त्यांच्या टीमने जेम्स वेब टेलिस्कोपच्या उच्च क्षमतेच्या प्रतिमांचा अभ्यास करत असताना या अनोख्या आकाशगंगेचा शोध लावला. प्राथमिक निरीक्षणात ही एक ‘जेलीफिश’ आकाशगंगा असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असले, तरी यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अधिक विश्लेषणाची गरज असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. त्यांचे हे संशोधन सध्या ‘arXiv’ या प्रीप्रिंट सर्व्हरवर उपलब्ध असून, लवकरच त्याचे समवयस्क-पुनरावलोकन (peer- review) केले जाईल.
जेलीफिश आकाशगंगा या त्यांच्या विशिष्ट रचनेमुळे ओळखल्या जातात. जेव्हा एखादी आकाशगंगा आपल्या समूहातील (galaxy cluster) इतर आकाशगंगांमधून वेगाने प्रवास करते, तेव्हा तिला प्रचंड दाबाचा सामना करावा लागतो. या प्रक्रियेला ‘रॅम प्रेशर स्ट्रिपिंग’ असे म्हणतात. या दाबामुळे आकाशगंगेतील वायू आणि धूळ बाहेरच्या दिशेने फेकली जाते आणि तार्यांचे लांब पट्टे तयार होतात. हे पट्टे जेलीफिशच्या तंतूंप्रमाणे दिसतात, म्हणूनच या आकाशगंगांना ‘जेलीफिश’ असे नाव दिले आहे. विशेष म्हणजे, या बाहेर फेकल्या गेलेल्या वायूंमधून अनेक नवीन तार्यांचा जन्म होतो. इयान रॉबर्टस् यांनी या शोधाबद्दल बोलताना सांगितले की, ‘एवढ्या सहजपणे अशी अनोखी आकाशगंगा सापडणे हेच सूचित करते की, विश्वात अशा अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. जर आपण पद्धतशीरपणे शोध घेतला, तर अशा अनेक अद्भुत खगोलीय रचनांचा खजिना सापडू शकतो.’