

व्हेनिस : अलीकडच्या काळातील सर्वात चर्चेत आलेला विवाह सोहळा भारतातच झाला होता. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या वैभवशाली विवाह सोहळ्याची चर्चा जगभर झाली. आता शतकातील सर्वात मोठा शाही विवाह सोहळा येत्या 27 जून रोजी होणार आहे. इटलीचं सर्वांग सुंदर शहर व्हेनिसमध्ये हा शाही विवाह सोहळा होणार आहे. अॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे उद्योजक जेफ बेजोस हे वयाच्या 61 व्या वर्षी दुसर्यांदा बोहल्यावर चढणार आहेत.
अमेरिकेतील लेखिका आणि पत्रकार लॉरेन वेंडी सांचेज यांच्याशी त्यांचा विवाह होणार आहे. या लग्नाला सर्वात भव्य लग्नसोहळा म्हटले जात आहे. या लग्न सोहळ्याला सिने कलाकार, राजकारणी आणि उद्योग जगतातील नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. तसेच या लग्नाला हजेरी लावणार्या प्रत्येक पाहुण्याला एक खास महागडं गिफ्ट दिलं जाणार आहे. त्यामुळे लग्नाबरोबरच या गिफ्टचीही चर्चा रंगली आहे.
जेफ बेजोस आणि लॉरेन सांचेज आपल्या पाहुण्यांना खास गिफ्ट देणार असल्याची चर्चा आहे. व्हेनिस येथील काच बनवणारी प्रसिद्ध कंपनी ‘लगुना बी’कडून पाहुण्यांना गिफ्ट म्हणून खास बॅग दिली जाणार आहे. या बॅगेत काय काय असणार? याचा खुलासा अद्याप झालेला नाही, पण ही बॅग अत्यंत खास असणार असल्याचं सांगितलं जात आहे. कपलला कोणतंही गिफ्ट देऊ नका. हवं तर तुम्ही चांगल्या कामासाठी ते दान करू शकता, असं पाहुण्यांना सांगितलं गेलं आहे. विशेष गोष्ट म्हणजे लग्नासाठीचं 80 टक्के जेवण व्हेनिस येथील स्थानिक विक्रेत्यांकडून घेतलं जाणार आहे.
यात मुरानोची प्रसिद्ध ग्लास कंपनी ‘लगुना बी’ आणि व्हेनिसची सर्वात जुनी मिठाई बनवणारं दुकान साल्वाचाही समावेश आहे. या शाही सोहळ्याला सुमारे 200 लोक येणार आहेत. जेफ आणि लॉरेन यांनी अधिक पाहुण्यांना बोलावलं नाही. फक्त निवडक पाहुणेच येणार आहेत. या लग्न सोहळ्यावर करोडो डॉलर खर्च करण्यात येणार आहेत. तसेच एका अहवालानुसार, कॉलिन कोवीसारख्या प्रसिद्ध वेडिंग प्लॅनर त्यांची फी म्हणून लग्नाच्या एकूण खर्चाच्या सुमारे 20 टक्के रक्कम घेतात. म्हणजेच जर एखाद्या लग्नाचा एकूण खर्च किमान 9.5 मिलियन डॉलर्स (सुमारे 79 कोटी रुपये) असेल, तर त्यांची फी साधारणतः 2 मिलियन डॉलर्स (सुमारे 16.5 कोटी रुपये) इतकी असू शकते. याशिवाय, लग्नाच्या कपड्यांवर, हेअरस्टाईल, मेकअप आणि फुलांच्या सजावटीवर सुमारे 4.3 कोटी रुपये खर्च येऊ शकतो. या खर्चाच्या आधारे त्या लग्नाची भव्यता आणि लक्झरी सहज समजून येऊ शकते.