

टोकियो : गुरुवारी (5 जून) जपानच्या एका खासगी चांद्रयानाचा संपर्क पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाशी तुटला. या यानामध्ये युरोपचे पहिले चांद्रयान ‘टेनेशियस’ होते. ‘रेझिलिएन्स’ नावाचे जपानी यान चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना, भारतीय वेळेनुसार दुपारी 3.17 वाजता नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटला.
‘रेझिलिएन्स’ हे जपानच्या ‘आयस्पेस’ कंपनीने बनवलेले दुसरे ‘हकुतो-आर’ यान आहे. या यानावर ‘टेनेशियस’ नावाचे चांद्रयान तसेच इतर काही उपकरणे पाठवण्यात आली होती. हे यान चंद्राच्या उत्तर गोलार्धमधील ‘Mare Frigoris’ म्हणजेच ’Sea of Cold’ या अज्ञात प्रदेशात उतरणार होते. या यानाने चंद्राच्या कक्षेत एक महिन्यापेक्षा जास्त काळ घालवला. यान उतरवताना संपर्क तुटल्यामुळे ‘टेनेशियस’ आणि इतर उपकरणांची स्थिती अनिश्चित आहे. ‘आयस्पेस’ कंपनीने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निवेदन जारी केले आहे की, ‘आम्ही अद्याप ‘रेझिलिएन्स’ सोबत संपर्क साधू शकलो नाही. परंतु, मिशन कंट्रोल सेंटरमधील आमचे अभियंते यानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
लवकरच आम्ही याबाबत अधिक माहिती देऊ’. ‘रेझिलिएन्स’ हे चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करणारे जपानचे तिसरे यान आहे. यापूर्वी ‘आयस्पेस’चे पहिले ‘हकुतो-आर’ यान एप्रिल 2023 मध्ये चंद्रावर उतरताना कॅ्रश झाले होते. कारण, त्याचे पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीचे "SLIM' यान (ज्याला ‘मून स्नायपर’ असेही म्हणतात) जानेवारी 2024 मध्ये चंद्रावर उलटे उतरले. परंतु, ते दोन चांद्र रात्री टिकून राहिले. ‘रेझिलिएन्स’ 15 जानेवारी रोजी स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेटद्वारे ‘नासा’च्या केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा येथून प्रक्षेपित करण्यात आले होते. याच रॉकेटने फायरफ्लाय एरोस्पेसचे ‘ब्लू घोस्ट’ यानदेखील प्रक्षेपित केले होते, जे 2 मार्च रोजी चंद्रावर उतरले.
‘रेझिलिएन्स’ यशस्वी झाल्यास, ते चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारे दुसरे खासगी चांद्रयान ठरेल. तसेच, ‘टेनेशियस’ हे युरोपमध्ये बनलेले पहिले चांद्रयान असेल. ‘टेनेशियस’ हे लहान असून, त्याची लांबी सुमारे 21 इंच (54 सेंटीमीटर) आहे आणि वजन फक्त 11 पौंड (5 किलोग्राम) आहे. या यानावर ‘द मूनहाऊस’ नावाचे एक छोटे लाल घर आहे, जे फक्त 4 इंच (10 सेंटीमीटर) उंच आहे. स्वीडिश कलाकार मायकेल जेनबर्ग यांनी ही कलाकृती बनवली आहे, ज्यांनी 1999 मध्ये या प्रकल्पाची कल्पना केली होती. जेनबर्ग म्हणाले, ‘माझ्यासाठी, ‘द मूनहाऊस’ हे एक सामायिक यश आहे. हे अनेक व्यक्तींच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे. हे एक लहान घर आहे, जे एका विशाल आणि रिकाम्या जागेत आहे. हे आपलेपणा, जिज्ञासा आणि असुरक्षिततेचे प्रतीक आहे’. ‘टेनेशियस’ दोन आठवड्यांपर्यंत ‘सी ऑफ कोल्ड’ मध्ये फिरणार होते. त्यानंतर, चांद्र रात्रीच्या वेळी त्याचे सौर पॅनेल प्रकाश गोळा करू शकत नसल्यामुळे ते निष्क्रिय होण्याची शक्यता आहे, असे ‘ईसीए’ ने सांगितले.