

टोकियो : जपानमध्ये डिमेन्शिया (स्मृतिभ्रंश म्हणजेच विस्मरण किंवा स्मरणशक्ती गमावणे) हे एक मोठे संकट बनत चालले आहे. गेल्या वर्षी, 2024 मध्ये डिमेन्शियाने ग्रस्त असलेले सुमारे 18,000 हून अधिक वृद्ध लोक घराचा रस्ता विसरून भटकले. यापैकी 500 जणांचे मृतदेह नंतर बेवारस अवस्थेत सापडले. आता अशा रुग्णांच्या मदतीसाठी सरकार एआय आणि रोबोंचा वापर करू लागले आहे.
जपानी अधिकार्यांच्या माहितीनुसार, 2012 पासून म्हणजे गेल्या 12 वर्षांत अशा प्रकरणांची संख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे जपान सरकार डिमेन्शियाला एक मोठे आव्हान मानत आहे आणि या समस्येवर मात करण्यासाठी जपानी सरकार तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम, रोबोटिक सहायक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सारखी तंत्रज्ञानं डिमेन्शियाने पीडित लोकांना ट्रॅक करण्यात त्यांची ओळख पटवण्यात आणि त्यांना भावनिक आधार देण्यात मदत करत आहेत.
एका रिपोर्टनुसार, जपान सरकारने डिमेन्शियाबाबतच्या धोरणास आपल्या सर्वात आवश्यक धोरणांपैकी एक मानले आहे. जपानच्या आरोग्य मंत्रालयाचा अंदाज आहे की, सन 2030 पर्यंत डिमेन्शियाशी संबंधित आरोग्य आणि सामाजिक देखभालीवरील खर्च 14 ट्रिलियन येन (सुमारे 90 अब्ज डॉलर) पर्यंत वाढेल. सध्या हा खर्च 9 ट्रिलियन येन इतका आहे. भटकणार्या लोकांना शोधण्यासाठी जपानमध्ये जीपीएस आधारित प्रणाली स्वीकारली जात आहे. अनेक भागांमध्ये लोकांना घालता येणारे जीपीएस टॅग दिले जात आहेत. जर एखादी व्यक्ती ठरवलेल्या ठिकाणातून बाहेर गेली, तर हे टॅग त्वरित अधिकार्यांना सूचित करतात.
यामुळे एक प्रकारचा सामुदायिक सुरक्षा कवच तयार होतो आणि हरवलेल्या व्यक्तीचा काही तासांत शोध लागतो. डिमेन्शियाचे लवकर निदान करण्यासाठीही नवीन तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. फुजित्सूची (Fujitsu) aiGait AI प्रणाली डिमेन्शियाच्या सुरुवातीच्या लक्षणांचे, जसे की चालताना पाय फरफटणे किंवा उभे राहण्यास अडचण येणे, निदान करू शकते. वासेडा युनिव्हर्सिटीचे संशोधक AIREC नावाचा एक रोबो विकसित करत आहेत. हा 150 किलोग्रॅम वजनाचा मानवासारखा रोबो भविष्यात देखभाल सहायक म्हणून पाहिले जात आहे. हा रोबो मोजे घालणे, अंडी फेटणे किंवा कपड्याच्या घड्या करणे यांसारखी कामे करेल.