

टोकियो : जपान हे राष्ट्र आपल्या प्रगत तंत्रज्ञानासाठी ओळखले जाते, मात्र आता येथील गुन्हेगारही तंत्रज्ञानाच्या पाऊलखुणा ओळखून अधिक ‘ॲडव्हांस’ झाले आहेत. जगभरातील चोर चोरी करण्यासाठी रोज नवनवीन मार्ग शोधत असतात; पण जपानमधून समोर आलेल्या एका बातमीने सर्वांनाच चक्रावून सोडले आहे. येथे चोर आता माणसांच्या मदतीने नाही, तर जिवंत खेकड्यांच्या सहाय्याने घरांची ‘रेकी’ (पाळत ठेवणे) करत आहेत.
‘जपान टाइम्स’च्या वृत्तानुसार, जपान पोलिसांनी एक इशारा जारी केला आहे. सराईत चोर आता घरांमध्ये घुसण्यासाठी आणि मौल्यवान वस्तूंचा पत्ता लावण्यासाठी जिवंत खेकड्यांचा वापर करत आहेत. हे ऐकायला विचित्र वाटत असले तरी, चोर याचा वापर घरात लोक आहेत की नाही, हे तपासण्यासाठी करत आहेत. चोर रात्रीच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाबाहेर किंवा परिसरात छोटे जिवंत खेकडे सोडून देतात. जर सकाळी खेकडा त्याच ठिकाणी सापडला, तर चोर असा अंदाज लावतात की घर बऱ्याच काळापासून बंद आहे किंवा तिथे कोणाचीही ये-जा झालेली नाही. जर खेकडा तिथून गायब असेल किंवा हलवलेला दिसला, तर त्याचा अर्थ घरात लोक असून त्यांनी तो हटवला आहे, असा घेतला जातो.
थोडक्यात, खेकड्याचा वापर एका ‘सिग्नल’सारखा केला जात आहे. या अजब पद्धतीची चर्चा आता संपूर्ण जपानमध्ये होत आहे. जर घराबाहेरून खेकडा गायब झाला, तर चोर चक्क सोशल मीडियावर त्याचा शोध घेतात. आजकाल लोकांना कोणतीही वेगळी गोष्ट दिसली की त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची सवय असते. चोर या फोटोंच्या मदतीने संबंधित व्यक्तीचे लोकेशन आणि घराचा नंबर शोधून काढतात. इतकेच नाही तर, त्या घरातील सदस्यांची माहितीही त्यांना मिळते. जेव्हा हे लोक सुट्ट्यांसाठी घराबाहेर जातात, तेव्हा चोर संधी साधून घरफोडी करतात. स्थानिक वृत्तानुसार, काही भागांत घराबाहेर अचानक खेकडे आढळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सुरुवातीला नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले; मात्र चोरीच्या वाढत्या घटनांनंतर पोलिसांना संशय आला की हा रेकीचाच एक भाग आहे. ‘घराच्या बाहेर कोणतीही संशयास्पद किंवा विचित्र वस्तू दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि तातडीने सतर्क राहा,’ असा सल्ला आता जपानमधील अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिला आहे.